दिवाळी साजरी करा फक्त वाढीव १६० ग्रॅम साखरेत
By admin | Published: November 2, 2015 02:01 AM2015-11-02T02:01:39+5:302015-11-02T02:01:39+5:30
दिवाळी म्हटली की, लाडू, करंजी, साटोरी, शंकरपाळी, पाकातले चिरोटे आठवतात. त्यासाठी रेशनवर वाढवून मिळणारी साखर हा गोरगरीबांचा आधार असतो
पंकज रोडेकर, ठाणे
दिवाळी म्हटली की, लाडू, करंजी, साटोरी, शंकरपाळी, पाकातले चिरोटे आठवतात. त्यासाठी रेशनवर वाढवून मिळणारी साखर हा गोरगरीबांचा आधार असतो. परंतु यंदा सरकारने रेशनवर दर माणशी फक्त १६० ग्रॅम साखर वाढवून दिल्याने दिवाळी साजरी करायची कशी? असा प्रश्न कार्डधारक जनतेला पडला आहे. पूर्वी मिळणाऱ्या खाद्यवस्तू सध्या रेशनिंग दुकानातून जवळपास हद्दपार झाल्या आहेत. तर या व्यतीरिक्त अन्य कोणत्याही चीजा रेशनवर सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.
ठाणे शिधावाटप कार्यालयाच्या ‘फ’ या परिमंडळात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महानगरपालिक ांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिके तील कार्यक्षेत्रांचा समावेश आहे. तर,ठाणे जिल्हापुरवठा विभागात जिल्ह्यातील (ग्रामीण) कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या पाच तालुक्यांचा समावेश आहे. शासनाकडून १०० टक्क्यांप्रमाणे ग्रामीण आणि शहरी भागास मंजूर नियतन दर महिन्याला दिले जाते. यामध्ये गहू आणि तांदूळाचे प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनांतर्गत नियतन दरमहा काढले जाते. दर महिन्यानुसार काढण्यात येणारे नियतन त्या तालुक्यांतील दुकानात पाठवण्यात येते. दिवाळीत ही ती वाढवून दिली आहे. तेल, डाळ आदी वस्तू अद्यापही आलेल्या नाहीत, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली. दर महा निघणारे २ हजार ११२ क्विंटल साखरे चे नियतन त्यामुळे या महिन्यात २७८८ क्विंटल झाले.
‘‘शासनाकडून या दिवाळीसाठी फक्त साखर वाढवून आली असून ती प्रति माणशी ५०० ऐवजी ६६० ग्रॅम देण्यात येणार आहे. ती देखील फक्त ग्रामीण भागातील कार्डधारकांना मिळणार आहे. मात्र, तेल, डाळ व अन्य खाद्यवस्तू सध्या तरी उपलब्ध झालेल्या नाही.’’
- मोहन नळदकर, ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी