भिवंडीकरांनी शासनाच्या सूचनांप्रमाणे गणेशोत्सव आनंदाने साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:43 AM2021-09-03T04:43:02+5:302021-09-03T04:43:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व जण गणेशोत्सव साजरा करणार आहोत, मात्र अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व जण गणेशोत्सव साजरा करणार आहोत, मात्र अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही, याचे भानदेखील बाळगणे आवश्यक आहे. तसे काही तज्ज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सर्व गोष्टी विचारात घेऊन राज्य शासनाने गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. या सूचना सर्वांनी पाळणे आवश्यक असून त्याप्रमाणे भिवंडीकरांनी सार्वजनिक गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा, असे आवाहन महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी गुरुवारी नागरिकांना केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत महापौर प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे महापालिकेत आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी महापौर प्रतिभा पाटील बोलत होत्या. या वेळी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर इम्रानवली मोहम्मद खान, भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त प्रकाश दिवटे, भाजपचे गटनेते हनुमान चौधरी, कोणार्क विकास आघाडीचे गटनेते विलास आर. पाटील, नगरसेवक हलीम अन्सारी, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत तसेच पालिकेचे अधिकारी, टोरंट पॉवर अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम न करता आरोग्यविषयक उपक्रम उदाहरणार्थ रक्तदान, आरोग्य तपासणी आदी उपक्रम आयोजित करावेत. साथीचे आजार जसे मलेरिया, डेंग्यू आदी साथीचे आजार व त्यावर करण्यात येणारे उपाय यासंबंधीची माहिती देण्यात यावी. कोरोनाबाबत जनजागृती करण्यात यावी. गणेशोत्सव हा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन महापौर पाटील यांनी केले. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भक्तगणांसाठी गणेश दर्शनाची सोय ऑनलाइन पद्धतीने, केबल, नेटवर्क, फेसबुक इत्यादीद्वारे करावी, जेणेकरून त्या ठिकाणी गर्दी होणार नाही. गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र सफाई, स्वच्छता ठेवावी, जंतुनाशक औषध फवारणी करावी, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, सर्व प्रमुख रस्त्यांवर डागडुजी करून खड्डे बुजवावेत, रस्ते दुरुस्त करावेत, विसर्जन घाटांवर अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे आदेशही महापौर पाटील यांनी प्रशासनास दिले आहेत.