थर्टी फर्स्ट आनंदाने साजरा करा... पण जपून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 02:21 AM2019-12-28T02:21:01+5:302019-12-28T02:21:05+5:30
दामिनी पथकाचीही राहणार गस्त : धांगडधिंगा करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर
जितेंद्र कालेकर
ठाणे : नववर्षाचे स्वागत जल्लोषाने जरूर करा. पण, नववर्ष स्वागताच्या नावाखाली मद्यप्राशन करून कुठेही धांगडधिंगा केल्यास नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीत होऊ शकते, असा इशारा ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरासह सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केल्याची माहिती फणसळकर यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ला दिली.
ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळांमधील सर्वच ३५ पोलीस ठाण्यांचा आयुक्तांनी आढावा घेतला. वर्षाच्या शेवटच्या दिवशी अर्थात ३१ डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्या परिमंडळ ठाणे, वागळे इस्टेट आणि कल्याणमध्ये विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साध्या वेशातील पोलीस बंदोबस्तावर राहणार आहेत. मुंबईत काही वर्षांपूर्वी थर्टी फर्स्टच्या एका पार्टीमध्ये एका तरुणीच्या छेडछाडीचा प्रकार घडला होता. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यातही वॉटर पार्क, मासुंदा तलाव, डोंबिवलीतील फडके रोड, कासारवडवलीतील ब्ल्यू रूफ याठिकाणी पोलिसांचे साध्या वेशातील दामिनी पथकही तैनात राहणार आहे.
वाहतूक विभागही करणार कारवाई
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवरही ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ निरीक्षकांच्या पथकांकडून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेचे ६०० अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.
मद्यपींना घरी सोडण्याची जबाबदारी : कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्याने मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, याबाबत बारमालकांच्या बैठकीतही सूचित केले आहे. त्यामुळे एकतर चालक देण्यात यावेत किंवा संबंधित मद्यपीला घरी सोडण्याची जबाबदारी घ्यावी, अशाही सूचना या बैठकीत दिल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
३१ डिसेंबर रोजी २०१९ या सरत्या वर्षाला निरोप देणारी आणि २०२० या नववर्षाच्या स्वागताच्या निमित्त ठाण्याच्या येऊरसह कल्याणचे खाडीकिनारे, ढाबे आणि हॉटेलमध्ये पार्ट्यांचे नियोजन केले जाते. बºयाचदा, पार्टीच्या नावाखाली हुल्लडबाजी, धांगडधिंगा घालून हाणामारीचेही प्रकार सर्रास घडतात.
यातूनच प्रकरण अगदी चाकूने वार होण्यापर्यंतही जाते. तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही सर्रास घडतात. याशिवाय, पार्टीच्या ठिकाणी जाणारी तरुण मंडळी मद्यप्राशन करून वाहने चालवितात. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघातही होतात. या सर्व पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांना कडक कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
येऊर, उपवनसह ठाण्यातील अनेक भागांत विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येऊरच्या खासगी बंगल्यांमध्ये पार्ट्यांचे सर्रास आयोजन केले जाते. हा परिसर ‘शांतता क्षेत्र’ म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने घोषित केला आहे. याठिकाणी कोणीही डीजे किंवा ध्वनिक्षेपक लावून ध्वनिप्रदूषण करून कायद्याचे उल्लंघन करू नये. याठिकाणी येणाºयांच्या नोंदी ठेवा. अशा आशयाच्या नोटीस तेथील बंगलेधारक तसेच हॉटेलमालकांनाही बजावण्यात आल्या आहेत. कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर वर्तकनगर पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.