भिवंडीत रमजान ईद उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 12:20 AM2019-06-06T00:20:59+5:302019-06-06T00:21:15+5:30
शहरातील कोटरगेट येथील मुख्य नमाज सकाळी सव्वानऊ वाजता पार पडली. त्यानंतर, सर्व मुस्लिमबांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
भिवंडी - रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. मंगळवारी सायंकाळी उशिरा चंद्रदर्शन झाल्यानंतर शहरातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत ईद साजरी करण्याची रात्रभर तयारी केली. मुस्लिमबांधवांनी खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी केल्याने रात्री २ पर्यंत बाजार फुलला होता. ईदनिमित्ताने बुधवारी शहरातील सर्व मशिदीमध्ये व ईदगाहवर नमाज अदा करण्यात आली.
शहरातील कोटरगेट येथील मुख्य नमाज सकाळी सव्वानऊ वाजता पार पडली. त्यानंतर, सर्व मुस्लिमबांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. तर, शहर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे व पोलीस अधिकारी यांच्याकडून सर्वांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. शांतीनगर भागातील अवलिया मशीद येथे सहायक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनीही गुलाबपुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रमजान ईदनिमित्ताने विशेष नमाज असल्यामुळे सकाळच्यावेळी शहरातील रस्तेवाहतुकीत बदल करण्यात आला होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी राज्य राखीव दलाच्या जवान व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शहरातील अनेक राजकीय नेत्यांनी मुस्लिमबांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.