ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वसुबारस साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 04:20 AM2018-11-05T04:20:40+5:302018-11-05T04:20:59+5:30
वेगाने बदलणाऱ्या जगात आदिवासीबांधव आपल्या समाजाची ओळख कायम ठेवू पाहत आहेत. यासाठी आदिवासी भाषा, संस्कृती हा अस्सल ठेवा म्हणून सिद्ध झाला आहे.
ठाणे - वेगाने बदलणाऱ्या जगात आदिवासीबांधव आपल्या समाजाची ओळख कायम ठेवू पाहत आहेत. यासाठी आदिवासी भाषा, संस्कृती हा अस्सल ठेवा म्हणून सिद्ध झाला आहे. यास कायम ठेवण्यासाठी यंदाही ठाणे व पालघर जिल्ह्यांतील वारली, कोकणा, महादेव कोळी, कातकरी, क-ठाकूर, म-ठाकूर जमातींमधील आदिवासीबांधवांनी रविवारी येथील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात वसुबारस पारंपरिक वेशभूषेत साजरी केली.
पूर्वजांनी जपून ठेवलेली संस्कृती आधुनिक काळातदेखील तितक्यात ताकदीने जतन करण्याचा प्रयत्न आदिवासीबांधव करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस हा सण आदिवासीबांधव येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. याप्रमाणे आजही आदिवासी पुरुष व महिलांनी एकत्र येऊन वसुबारस पारंपरिक पद्धतीने नाचगाणी म्हणून साजरी केली. वारली समाजसेवा मंडळाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रेय भुयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी या मैदानावरील तारपाधारी अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वसुबारस साजरी करण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात १४ वर्षांपासून वसुबारस केली जात आहे. यंदाचे हे पंधरावे वर्ष असून सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी आदिवासी जिल्ह्याची ओळख व संस्कृतीचे प्रतीक कुलदैवत तारपाधारी अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी तारपा नृत्य सादर केले. आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरा (भांगरे) यांना अभिवादन करण्यात आल्याचे भुयाळ यांनी सांगितले.