भिवंडीत ठिकठिकाणी योग दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:51 PM2019-06-21T23:51:26+5:302019-06-21T23:51:37+5:30
योग शिबिरांतून केले मार्गदर्शन; पोलीस, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
भिवंडी : शहरामध्ये विविध ठिकाणी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, पोलीस आणि नागरिकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानिमित्त नागरिकांनी शिबिरात सहभाग घेऊन नियमित योगासने करण्याचा निर्धार केला.
शहरातील वºहाळामाता मंगल कार्यालयात पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ अंतर्गत अंबिका योग कुटीर यांच्याद्वारे योग शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. शिबिरामध्ये योगासने प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व सांगितले. नियमित योगासने केल्याने पोट, मान, डोळे आणि शरीरातील विविध विकार दूर होतात. पोलिसांनी तणावमुक्त राहण्यासाठी नियमित योगासने करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
विविध शाळांमधूनही सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे प्रशिक्षण व महत्त्व सांगण्यात आले. तालुक्यातील राहनाळ या गावात स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सपना राजेंद्र भोईर, पंचायत समिती सदस्य ललिता प्रताप पाटील यांच्या पुढाकाराने महिलांसाठी विशेष योगासने शिबिरे झाली. खोणी गावातील कोमल शिंगोळे यांनी योगाभ्यास वर्ग घेतला. पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनीही पोलिसांसाठी कामतघर येथील वºहाळादेवी मंगल सभागृह येथे योग शिबिर घेतले.
योगाभ्यासाचे धडे
शेणवा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा खराडे अंतर्गत आवळपाडा, डोहळेपाडा, कुंभईवाडी, कवटेवाडी, चाफेवाडी, आंबेखोर, निमनपाडा या शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. शरीर, मन, आरोग्य, स्वास्थ्य राखण्यासाठी जीवनात योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे, हे यावेळी विद्यार्थ्यांना पटवून देऊन योग, भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असल्याचे सांगण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा फसाळे आणि सहशिक्षिका जयश्री पाटील यांनी योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना विविध आसनांबाबत मार्गदर्शन केले. ताणतणावांचे प्राणायामच्या माध्यमातून व्यवस्थापन करता येते. मित्र, कुटुंबीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे, योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन केंद्रप्रमुख मेंगाळसर यांनी केले.
आत्मा मालिक संकुल येथे योगासनांची प्रात्यक्षिके
वासिंद : शहापूर तालुक्यातील मोहिली, अघई येथील आत्मा मालिक शैक्षणिक आणि क्रीडासंकुलात तसेच जिल्हा परिषद शाळा, वासिंद येथे पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील योगशिक्षक पुरु षोत्तम पानगुडे, ए.जी. डुकरे, गिरीश लिहे, दराडे यांनी योगाचे महत्त्व विशद करून प्राणायाम व विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली.