ठाण्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी, सोन्याचा नारळ अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 04:16 AM2018-08-26T04:16:56+5:302018-08-26T04:17:32+5:30

दर्याला सोन्याचा नारळ अर्पण : खाडीकिनारी आगरी-कोळी-बांधवांचा जनसागर, पारंपरिक नृत्यांवर धरला ठेका

Celebrating the coconut melodrama in Thane, offering golden coconut | ठाण्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी, सोन्याचा नारळ अर्पण

ठाण्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी, सोन्याचा नारळ अर्पण

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने नारळी पौर्णिमा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दर्याची पूजा करून शहराचा मानाचा नारळ दर्याला अर्पण केला. यावेळी कळवा खाडीकिनारी जत्रेचे स्वरूप आले होते. यामुळे कळवा पुलावरील वाहतुकीत बदल केला होता.

यावेळी नागरिक तसेच कोळी-आगरी-बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगरी-कोळी लोककलेवर आधारित एका सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजनही यावेळी केले होते. पावसाळ्यानंतर उदरनिर्वाहासाठी मासेमारी सुरू करण्यापूर्वी दर्याराजाला शांत करण्यासाठी आगरी-कोळी-बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी मानाचा सोन्याचा नारळ अर्पण करून हा उत्सव साजरा करतात. पारंपरिक कोळीगीतांवर ठेका धरून दर्यासागराला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा सण कळवा खाडी परिसरात उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. दुपारपासूनच कोर्टनाक्याहून कळवा खाडी ब्रिजवर जाणारे सर्व रस्ते गर्दीने फुलले होते. या ठिकाणी भरलेल्या जत्रेत खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन महिने विश्रांती घेतलेल्या नौका रंगरंगोटी करून पुन्हा खाडीत उतरवण्यात आल्या. यावेळी खाडीची विधिवत पूजा करण्यात आली. सणाच्या आनंदाबरोबरच यंदा भरपूर मासे मिळून चांगला व्यापार होऊ दे आणि सुखशांती मिळू दे, असे साकडे कोळीबांधवांनी दर्यासागराला घातले.

दरम्यान, दुपारपासूनच कळवा खाडीवरील वाहतूक बंद केली होती. आधीच या पुलाच्या ठिकाणी तिसऱ्या पुलाचे काम सुरू असल्याने कोंडी होत आहे. त्यात शनिवारी या सणानिमित्त वाहतूक बंद करून ती इतरत्र वळवल्याने विटाव्याकडून येणारी वाहतूक कळवानाक्यापर्यंतच येऊन ठेपली होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्ट, ठाणे व चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मीठबंदर रोड येथील कस्टम जेट्टी-विसर्जन घाट याठिकाणी यंदाही पारंपरिक सतराव्या नारळी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने सवाद्य शोभायात्रेचे कोळी वेशभूषेत आयोजन करण्यात आले. सोन्याचा नारळ विधिवत दर्याराजाला अर्पण करण्याचा मान यंदा निशिगंधा (नीशा) व ओंकार प्रमोद कोळी या नवविवाहित जोडप्याला देण्यात आला होता. कोपरी येथील आनंदनगर भागातील गांधीनगरमधील आगरी-कोळी-बांधवांनीही पारंपरिक नृत्य सादर करून उत्साहाने वाजतगाजत गाºहाणे घालून दर्याराजाने आतातरी शांत व्हावे, अशी आर्त हाक दिली.

कल्याणमध्ये मिरवणुकीचा जल्लोष
कल्याण : आगरी कोळी उत्कर्ष मंडळातर्फे शुक्रवारी नारळी पौर्णिमेनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात लाल टोप्या घालून सहभागी झालेल्या आगरी कोळीबांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शिवाजी चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली.
बैलगाडीवर सोनेरी नारळ सजवून ठेवला होता. प्रारंभी युवा गर्जना ढोलताशा पथकाने गजर करत जोरदार सलामी दिली. बैलांसह सजवलेल्या गाड्यांवर लहान मुले बसली होती. ‘सन आयलाय गो नारळी पुनवेचा’ या गाण्यावर आगरी कोळीबांधवांनी नृत्याचा ठेका धरला होता.

मिरवणुकीत खा. कपिल पाटील, आ. नरेंद्र पवार, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, सुनील वायले, जयवंत भोईर, दीपक भोईर, विनोद डोणे, दया गायकवाड, शक्तिवान भोईर आदी सहभागी झाले. शिवाजी चौकातून काढलेल्या या मिरवणुकीची सांगता दुर्गाडी खाडीजवळ झाली. यावेळी सोनेरी नारळ अर्पण केला.

Web Title: Celebrating the coconut melodrama in Thane, offering golden coconut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.