सोशल मीडियावरून शुभेच्छा देत महाराष्ट्र दिन, कामगार दिन साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 01:44 AM2020-05-02T01:44:05+5:302020-05-02T01:44:14+5:30
सर्वांनी संयम राखत घरीच थांबत महाराष्ट्र दिनाच्या एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
स्नेहा पावसकर
ठाणे : महाराष्टÑ दिनानिमित्त दरवर्षी ठिकठिकाणी ध्वजारोहण किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजिले जातात. मात्र यंदा कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय वगळता कुठेही ध्वजारोहण झाले नाही. उलट सर्वांनी संयम राखत घरीच थांबत महाराष्ट्र दिनाच्या एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
१ मे रोजी महाराष्टÑ दिन आणि कामगार दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने काही कार्यालये, सोसायट्यांमध्ये ध्वजारोहण होते, सत्यनारायण पूजा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले जातात. तर काही कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना सुटी असते. मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण सर्व गेल्या दीड महिन्यापासून घरातच आहोत. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर निघता येत नाही. गेल्या दीड महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे सण-उत्सव कोरोनामुळे सार्वजनिक ठिकाणी साजरे झालेच नाहीत. मात्र, एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात.
शुक्रवारीही महाराष्टÑ दिन आणि कामगार दिनाचे शुभेच्छापर, तसेच महाराष्टÑाच्या महानतेचे वर्णन करणारे, छत्रपती शिवरायांचे फोटो आणि भगवा झेंडा असलेले, मेसेज, पोस्टस् व्हॉटस्अॅप, फेसबुकवर पाहायला मिळाले.
‘महान तो इतिहास, महान ती संतांची भूमी,
महान ती संस्कृती, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या
आपल्या एकुलत्या ‘महा’राष्टÑाची...,’
‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्या देशा,
प्रणाम घ्यावा आमचा हा महाराष्टÑ देशा...,’
‘तुम्ही कितीही इंग्रजी शिका, स्वप्न मराठीतच पडतात...,’ ‘अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्टÑीयन असल्याचा...,’
असे महाराष्टÑाप्रती अभिमान व्यक्त करणारे मेसेजेस झटपट पोस्ट होत होते. तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही काही मेसेजेस् वाचायला मिळाले.
‘कितीही मोठं संकट येवो,
छाताडावर पाय ठेऊन उभा राहतो महाराष्टÑ माझा,
घरीच राहून गर्दी टाळून
कोरोना संकटातून मुक्त करू या महाराष्टÑ देशा...’
‘घरी राहून कोरोनाचा प्रसार अडवूया,
आपला प्रिय महाराष्ट्र
धर्म वाढवूया...,’
‘करू प्रयत्न घरात राहण्याचा,
उद्देश कोरोनाला हरवण्याचा,
महाराष्टÑासह देश कोरोनामुक्त करण्याचा...’
>कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देणारे विनोदी मेसेज सोशल मीडियावर वाचायला मिळाले. ‘आॅफिसमध्ये मोठे पद मिरवणाºया पण सध्या घरगडी/ हरकाम्या/ वेठबिगारी कामगाराचे काम करणाऱ्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा.’‘आमच्याकडे बालकामगार काम करत नाहीत, इतकेच काय तर कामावर असलेलेही काम करत नाहीत, अशाही सर्वांना कामगार दिनाच्या शुभेच्छा.’