उल्हासनगरात शिवजयंती उत्सवात साजरी, महापालिकेच्या वतीने सफाई अभियान
By सदानंद नाईक | Published: February 19, 2024 05:05 PM2024-02-19T17:05:53+5:302024-02-19T17:06:35+5:30
उल्हासनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उल्हासनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या वतीने उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात सफाई अभियान राबविले. तर स्वराज्य सेवक मित्र मंडळाच्या वतीने नेताजी चौक ते दुर्गाडी किल्ला दरम्यान बाईक रॅली काढण्यात आली असून राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने भाटिया चौकात मशाल ज्योतीचे आयोजन करण्यात आले आहे.
उल्हासनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शहर भगवेमय झाल्याचे चित्र होते. महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यानी महापालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आयुक्त अजीज शेख यांच्या संकल्पनेतून मध्यवर्ती रुग्णालय, उल्हास स्टेशन, स्काय वॉक, तहसील कार्यालय आदी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविली. रुग्णालयाच्या परिसरातील सफाईतून १५ ते २० मेट्रिक टन कचरा काढून परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली.
महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत विविध प्रसंग नाटिकेतून यावेळी जिवंत केले. महाराजांच्या आरमाराबद्दल व जीवनातील महत्त्वाच्या अशा सागरी लढायांबद्दल व सागरी दुर्गांबद्दल राहुल कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रायगड जिल्हा परिषद यांनी व्याख्यान दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, लेखापरीक्षक शरद देशमुख, सहायक सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, जेठानंद, दत्तात्रय जाधव व जनसंपर्क विभाग प्रमुख छायाडांगळे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
शहरातील स्वराज्य सेवक मित्र परिवाराने नेताजी चौक ते दुर्गाडी किल्ला दरम्यान बाईक रॅली काढूली. तर कॅम्प नं-५ भाटियाचौकात राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने मशाल ज्योतीचे आयोजन केले होते. कुर्लाकॅम्प परिसरात बाळा गुंजाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
* किल्ले प्रदर्शनाला गर्दी*
कॅम्प नं-४, मराठा सेक्शन परिसरातील नाना-नानी पार्क येथे महापालिकेने आयोजित केलेल्या किल्ला स्पर्धेला आयुक्त अजीज शेख यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या किल्ल्यांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना किल्ले स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन आयुक्त अजिज शेख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.