सेलिब्रिटी लसीकरण प्रकरण: ओम साई आरोग्य केअर प्रा. लिमिटेडवर भाजपची कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 04:34 PM2021-06-04T16:34:44+5:302021-06-04T16:42:15+5:30
Coronavirus Vaccine : निरंजन डावखरे यांनी केली आयुक्तांकडे मागणी. काही दिवसांपूर्वी बनावट ओळखपत्र तयार करून एका अभिनेत्रीनं घेतली होती लस.
ठाणे : अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्र तयार करून तिला बेकायदेशीरपणे लस देण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल आता महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. या अहवालानुसार एकट्या मीरा चोप्रालाच अशा प्रकारे बेकायदेशीर लस देण्यात आली नसून २१ श्रीमंत तरुण आणि तरुणींचे बनावट ओळखपत्र तयार करून १५ जणांना अशा प्रकारे लस देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये आणखी एका हिंदी मालिकेमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला अॅडमीनच्या नावाने बनावट ओळखपत्रही देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु तिने लस घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या प्रकरणानंतर ओम साईन आरोग्य केअर प्रा. लिमिटेड ही कंपनी आता अडचणीत आली असून, सदर कंपनीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपचे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद केले असताना मात्र अभिनेत्री मीरा चोप्राला लस देण्यासाठी तिला या फ्रंटलाईन वर्कर दाखवून पालिकेच्या पार्कीग प्लाझा या ठिकाणी लस देण्यात आली होती. त्यानंतर आणखी एका हिंदी सिरीअलमध्ये काम कणाऱ्या एका अभिनेत्रीला अॅडमिनच्या नावाने ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आणखी २१ जणांना अशाच प्रकारे ओळखपत्र देण्यात आले असून त्यातील १५ जणांचे लसीकरण झाल्याची माहिती देखील अहवालातून समोर आली होती. गुरुवारी या संदर्भातील अहवाल चौकशी समितीने आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सादर केला आहे. आता आयुक्त या संदर्भात काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजपचा आक्रमक पवित्रा
दरम्यान दुसरीकडे या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून त्यांनी आता लसीकरणाचा भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधीत ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. या कंपनीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. या कंपनीच्या विरोधात अनेक अनियमिततेचे ठपके ठेवण्यात आले आहेत. नर्सेच्या पगारांचा विषय असेल किंवा ग्लोबलमधील व्हेंटिलेटर भ्रष्टाचाराचे प्रकरण असेल यामध्ये या कंपनीचे नाव पुढे आलेले आहे. परंतु या प्रकरणात महापालिका संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा आरोपही डावखरे यांनी केला आहे. चौकशी सुरु असतांना चौकशी समितीने संबंधीत ठेकेदाराला चौकशीसाठी बोलावले होते. परंतु त्यांनी हजेरी लावली नसून हा चौकशी समितीचा आणि पालिकेचा अपमान आहे. त्यामुळे संबधींतावर तत्काळ कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.