सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर केले पुन्हा सिमेंट रस्त्याचे काम; अन्यत्र खराब रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 01:10 AM2020-11-29T01:10:45+5:302020-11-29T01:11:06+5:30
मूलभूत सुखसुविधा योजना उल्हासनगर कॅम्प नं-४, मराठा सेक्शनकडून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची स्टेशनलगत दुरवस्था झाली होती.
सदानंद नाईक
उल्हासनगर : मराठा सेक्शन ते स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण झाले असून हा रस्ता चांगल्या स्थितीत असतानाही पुन्हा तेथेच शासनाच्या मूलभूत सुखसुविधा योजनेतून सिमेंट रस्ता बांधण्यात येत असल्याबद्दल सर्व स्तरांतून टीका होत आहे. शहरातील अन्य काही रस्त्यांची दुरवस्था झाली असताना महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या या कामाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, मराठा सेक्शनकडून स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याची स्टेशनलगत दुरवस्था झाली होती. एका वर्षापूर्वी शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत जंगल हॉटेल ते उल्हासनगर स्टेशनदरम्यान रस्ता बांधणीला पाच कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली. त्याच वेळी संपूर्ण रस्ता चांगल्या अवस्थेत असून स्टेशन परिसरात खराब असल्याचा आक्षेप मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी घेतला होता. अखेर, महापालिकेने रस्ता जेथे खराब आहे, त्या ठिकाणी रस्ता नव्याने बांधणार असल्याचे सांगून, रस्त्याचा निधी प्रभागातील इतर कामासाठी वापरण्यास सांगितले. अखेर, रस्त्याचे काम सुरू झाले असून अरुंद ठिकाणी रस्ता रुंद करण्यात आला. तसेच सुस्थितीत असलेल्या सिमेंट रस्त्यावर नव्याने सिमेंट रस्ता बांधण्यात येत असून रस्ताबांधणीवर सर्वस्तरांतून टीका होत आहे. महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश शितलानी यांच्याशी संपर्क झाला नाही.
प्रभाग समिती बांधकाम विभाग अभियंता अश्विनी आहुजा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासनाच्या मूलभूत योजना निधीतून रस्त्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. तसेच उर्वरित निधीतून एलईडी दिवे लावण्यासह रस्त्याच्या नाल्यांचे काम करणार असल्याची माहिती दिली. मात्र, चांगल्या अवस्थेतील सिमेंट रस्त्यावर पुन्हा सिमेंट रस्ता बांधला जात असल्याने चर्चा शहरात होत आहे. चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्यावर सिमेंट रस्ता न बांधता, रस्त्याच्या उर्वरित निधीतून दिवे लावणे, नाले बांधणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.