जिल्ह्यातील बचत गटांमधील एक लाख महिलांच्या व्यावसायिक ट्रेनिंगसाठी आता शहापूरला सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:46+5:302021-09-27T04:44:46+5:30
ठाणे : जिल्ह्यातील १० हजार बचत गटांत एक लाख १४ हजार महिलांचा समावेश आहे. या महिलांसह जिल्ह्यातील ग्रामसंघ, प्रभाग ...
ठाणे : जिल्ह्यातील १० हजार बचत गटांत एक लाख १४ हजार महिलांचा समावेश आहे. या महिलांसह जिल्ह्यातील ग्रामसंघ, प्रभाग संघ आदींच्या हजारो सभासदांना व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्यपूर्ण कलेचे शिक्षण देण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास योजनेंतर्गत शहापूर येथे भव्य प्रशिक्षण सेंटर सुरु केले आहेत. त्याद्वारे या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सभासदांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे.
जिल्ह्यात १० हजार ४१३ स्वयंसहाय्यता समूह आहेत. त्यात एकूण एक लाख १४ हजार ७१५ महिलांचा सहभाग आहे, तर ८१५ ग्रामसंघ आणि ३२ प्रभाग संघ आहेत. जिल्ह्यात सध्या बचत गटातील महिलांकडून विविध उपजीविकेअंतर्गत व्यवसाय केले जात आहेत. यामध्ये भाजीपाला लागवड, मत्स्यशेती, मत्स्य जाळी बनविणे, समूह शेती, फुल शेती, कुक्कुट पालन, शेळीपालन, खाद्य व्यवसाय, विकेल ते पिकेल, घरकुल मार्ट, लोणचे - पापड बनविणे, अवजार बँक चालविणे, घरकुल मार्ट, किराणा दुकान, गणपती बनविणे, मातीच्या वस्तू, बांबूच्या नक्षीदार वस्तू, पुरणपोळी बनविणे, कापडी पिशव्या बनविणे, टेलरिंग व्यवसाय, बुटिक प्रिंटिंग आदी व्यवसाय करण्यासाठी जिल्ह्यातील महिला आजघडीला सक्षम आहेत.
अंबरनाथ तालुक्यातील पुरणपोळी व बुटिक पेंटिंग करणाऱ्या महिलांचे बचत गट व्यवसायासाठी परदेशात जाऊन आले आहेत. अशा प्रकारे अभियानामुळे ग्रामीण भागातील महिला सशक्त होऊन तिचे व तिच्या कुटुंबाचे सामाजिक आणि आर्थिक समावेशन झाले आहे. या कुटुंबांची आर्थिक उन्नती व्हावी, यासाठी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांना आर्थिक, सामाजिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण हाती घेण्यात आले आहेत. यासाठी उत्तम प्रशिक्षण संकुलाची नेहमीच गरज लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पामधून शहापूर येथे प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.