'स्मार्ट सिटीसाठी पैसा केंद्राचा, उदो उदो मात्र शिवसेनेचा'; भाजपा आमदारानं अधिकाऱ्यांना खडसावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 03:38 PM2021-12-16T15:38:06+5:302021-12-16T15:39:45+5:30
ठाणे शहरात केंद्राने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुमारे १२ विकासकामांसाठी निधी दिला आहे. त्यातील काही कामे झाली असून काही सुरू आहेत.
ठाणे-
ठाणे शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत विकासकामांसाठी केंद्राने निधी पाठवला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख कामाच्या ठिकाणी झालाच पाहिजे, असे ठणकावत भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी आज पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
ठाणे शहरात केंद्राने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुमारे १२ विकासकामांसाठी निधी दिला आहे. त्यातील काही कामे झाली असून काही सुरू आहेत. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. याबाबत ठाण्यातून भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय नगर विकासमंत्री हरदीप पुरी यांना भेटले होते. या कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी स्मार्टसिटी योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या कामांची पाहणी आज केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे तसेच ठामपा गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, कार्यकारी अभियंता प्रवीण फापळकर आदी उपस्थित होते.
दौऱ्यात गावदेवी मैदान येथील विकासकामाची पाहणी करण्यात आली. 'शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांसाठी केंद्राने निधी दिला असताना या कामांचे श्रेय सत्ताधारी शिवसेना घेऊ पाहत आहे. कामाच्या ठिकाणी शिवसेनेचे फलक झळकत आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ठाण्यातील मासुंदा तलाव, गावदेवी मैदान, खाडी किनाऱ्यावरील विकास कामे, डिजी ठाणे, सॅटिस आदी कामे होत आहेत. ही कामे जणू सत्ताधारी शिवसेनाच करत आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. यापुढे या कामांच्या ठिकाणी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख झळकलाच पाहिजे. अधिकाऱ्यांनी केंद्राची योजना या दृष्टीने काम करावे, असे आमदार संजय केळकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुनावले. उर्वरित कामांची पाहणीही लवकरच करण्यात येईल असेही केळकर यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. शिष्टमंडळाने केलेल्या मागणीनुसार केंद्राचे एक पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे. त्यावेळी सत्य नक्कीच ठाणेकरांसमोर येईल, असेही आमदार केळकर म्हणाले.