स्मार्ट सिटीतील गैरव्यवहाराबाबत केंद्र सरकारने अहवाल मागविला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 05:35 PM2022-01-10T17:35:05+5:302022-01-10T17:35:30+5:30
राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र, २७ जानेवारीपर्यंत कारवाईचे आदेश
ठाणे : ठाणे शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. `स्मार्ट सिटी मिशन'चे संचालक कुणालकुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना ६ जानेवारी रोजी पत्र पाठविले आहे. त्यात ठाणे स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची चौकशी करून २७ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष कृती अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट) पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामांची प्रत्यक्षात चौकशी सुरू झाल्यामुळे ठाणे महापालिकेत खळबळ उडाली आहे.
केंद्र सरकारच्या ५० टक्के निधीतून राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेतील काही कामांमध्ये गैरव्यवहार व बहुसंख्य कामे मंदगतीने सुरू असल्याबाबत ठाणे शहर भाजपाने केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे तक्रार करून विशेष बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय नगर विकास खात्यातर्फे ७ डिसेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणालकुमार यांच्याबरोबरच नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, भाजपाचे राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, शहर उपाध्यक्ष सुजय पतकी यांचीही उपस्थिती होती. या बैठकीत चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिले होते. त्यानुसार ६ जानेवारी रोजी प्रत्यक्ष चौकशीचे आदेश काढण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेतून ठाणे शहरात ३८७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांचा काहीही फायदा झालेला नाही, याकडे भाजपाच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. नवीन रेल्वे स्थानक, ठाणे पूर्व सॅटीस, वॉटरफ्रंट आदींबरोबरच डिजि ठाणे, स्मार्ट शौचालय आदींचा बोजवारा उडाल्याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले होते.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनकडून चौकशीची कार्यवाही सुरू झाली होती. मात्र, ठाणे महापालिकेला तातडीने चौकशीसंदर्भात पत्र पाठविले नव्हते. त्यावरुन महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने २० डिसेंबर रोजीच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना नगरसेवकांकडून चौकशीसंदर्भातील वृत्ताची `खिल्ली' उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच चौकशीसंदर्भात अविश्वास दाखविण्यात आला होता. मात्र, आता पंधरा दिवसांतच चौकशीचे पत्र महापालिकेत धडकल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामातील गैरव्यवहारासंदर्भात राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे. त्यावरुन स्मार्ट सिटीतील गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करावी. तसेच स्मार्ट सिटी मिशनला २७ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष कृती अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट) पाठवावा, असे स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख कुणालकुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना ६ जानेवारी रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची ही पहिली फेरी : निरंजन डावखरे
ठाणे महापालिकेत भ्रष्टाचाराची मालिकाच सुरू आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांबरोबरच विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला. स्मार्ट सिटी योजनेत करण्यात आलेल्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीची ही पहिली फेरी आहे. या चौकशीतून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार उघड होईल, अशी सुचक प्रतिक्रिया भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.