मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून 500 ग्रॅमच्या बाळाला जीवनदान

By पंकज पाटील | Published: October 2, 2023 07:01 PM2023-10-02T19:01:37+5:302023-10-02T19:01:58+5:30

सहाव्या महिन्यात जन्मल्याने वजन होते अतिशय कमी

central hospital doctor given life to 500 gram baby ambernath | मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून 500 ग्रॅमच्या बाळाला जीवनदान

मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून 500 ग्रॅमच्या बाळाला जीवनदान

googlenewsNext

अंबरनाथ : मध्यवर्ती रुग्णालयात ममता निकम या महिलेची सहाव्या महिन्यात प्रसूती होऊन ५०० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिला होता. डॉक्टर व नर्सनी नवजात शिशुकक्षात बाळावर तीन महिने यशस्वी उपचार करून बाळाला सुखरूप पणे त्याच्या मातेच्या स्वाधीन केले आहे. आता बाळाचे वजन वाढले असून तब्येत सुदृढ झाल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे यांनी दिली.

अंबरनाथमधील गायकवाड पाडामध्ये राहणाऱ्या ममता निकम या गर्भवती महिलेच्या पोटात दुखत असल्याने,ती उपचार करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी मध्यवर्ती रुग्णालयात आली. सहा महिन्यांची गर्भवती असणाऱ्या ममता हिने उपचारादरम्यान कमी दिवसांच्या बाळाला जन्म दिला. त्यावेळी बाळाचे वजन अवघे ५०० ग्रॅम असल्याने, कमी वजनाच्या बाळाच्या तब्येतीबाबत कुटुंबासह डॉक्टर्स व नर्स यांच्या समोर यक्षप्रश्न उभा ठाकला होता. मात्र,डॉ.वसंतराव मोरे,डॉ. वैशाली पवार, डॉ. किरण बनसोडे, डॉ.आझम खान, डॉ. पूजा यादव, नर्स जयश्री शिंदे, गौरी केलसीकर यांनी सतत तीन महिने या बाळाला तळहातावरील फोडासारखे जपले. जणू या बाळाचा पुनर्जन्म झाला. उपचारादरम्यान बाळाच्या डोळ्याला संसर्ग झाल्याने, त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

आईच्या जिद्दीला सलाम : ममता निकम या महिलेची सहाव्या महिन्यात प्रसूती होऊन अवघ्या ५०० ग्रॅम वजनाच्या बाळाला जन्म दिल्याने, तिच्या कुटुंबाने बाळाच्या जगण्याची आशा सोडली होती.मात्र ममता यांनी जिद्द सोडली नाही.आईच्या जिद्दीला डॉक्टर व नर्सनी सलाम ठोकून उपचार केले.

असुविधांवर मात : मध्यवर्ती रुग्णालयातील नवजात शिशू कक्षाची क्षमता १० बालकांची असून व्हेंटिलेटरची सुविधा नाही. अशा अपुऱ्या सुविधांवर मात करीत डॉक्टरांनी बाळाची प्रकृती ठणठणीत करून घरी सुखरूप पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

Web Title: central hospital doctor given life to 500 gram baby ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.