३७ हजार विद्यार्थ्यांना विमा सुरक्षा , माध्यान्ह आहार योजनेसाठी मध्यवर्ती स्वयंपाक केंद्रही उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:01 AM2017-09-01T01:01:18+5:302017-09-01T01:01:29+5:30
ठाणे महापालिका शाळांमधील तब्बल ३७ हजार ४१ विद्यार्थ्यांना आता विमा सुरक्षा कवच मिळाले आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्यातून पालिकेने विद्यार्थ्यांचा हा अपघात विमा काढला आहे.
ठाणे : ठाणे महापालिका शाळांमधील तब्बल ३७ हजार ४१ विद्यार्थ्यांना आता विमा सुरक्षा कवच मिळाले आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्यातून पालिकेने विद्यार्थ्यांचा हा अपघात विमा काढला आहे. त्यामुळे अपघाती मृत्यू झाल्यास संबंधितांना दीड लाखांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे. तर पाच हजार विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह आहार योजनेसाठी मध्यवर्ती स्वयंपाक केंद्रही पवारनगर भागात सुरु करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी प्रतिनिधिक स्वरुपात अपघाती विम्याची कागदपत्रे पालिका प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. देशातच नव्हे तर जगभरात प्रथमच महापालिका शाळांमधील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे. शहरातील आर्थिकदृष्टया दुर्बल, डोंगराळ तसेच खाडीकिनारी वास्तव्यास असलेल्या पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २४ तास हे सुरक्षा कवच देण्याच्या दृष्टीने ही अपघातविमा योजना राबविणार असल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. याअंतर्गत ५५ बालवाड्या, १२५ मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यंमाच्या प्राथमिक शाळा, १६ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू ओढवल्यास तसेच कायमचे अपंगत्व आल्यास दीड लाख रुपये तर अपघातामुळे एखादा अवयव निकामी झाल्यास ७५ हजार, अपघातामुळे उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चासाठी ३५ हजार इतके अर्थसहाय्य पालकांना दिले जाणार आहे. या विमा कवचामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्यांचा चांगला फायदा होणार आहे.
महापालिका आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे लेकसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षयपात्र फाउंडेशन आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पवारनगर येथे महापालिकेच्या २६ शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन आहार योजनेतून मध्यवर्ती स्वयंपाक केद्र सुरु केले आहे. त्याचेही उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी बुधवारी केले.