सेंट्रल पार्क लोकार्पणासाठी सज्ज; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण!
By अजित मांडके | Published: February 5, 2024 04:25 PM2024-02-05T16:25:38+5:302024-02-05T16:25:52+5:30
लहान मुलांना खेळण्यासाठी देखील एक वेगळा झोन असणार आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन टिडीआरच्या बदल्यात ढोकाळी येथील २० एकरचा भुंखडावर ठाणेकरांना सेंट्रल पार्क उपलब्ध होणार आहे. येत्या ८ फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पार्कचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे तमाम ठाणेकरांना आता एकाच छताखाली जॉगींग, सायकलींग यांच्यासह जंगलातुन फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच तीन आर्टीफीशल तलाव देखील ठाणेकरांना उपलब्ध होणार आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी देखील एक वेगळा झोन असणार आहे. एकूण चार झोनमध्ये हे सेंट्रल पार्क असणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.
सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कल्पतरू पार्कसिटीमध्ये २०.५ एकरवर (८२८९० चौरस मीटर) जागेवर ग्रैंड सेंट्रल पार्क साकारले गेले आहे. विविध प्रकारची ३५०० हून अधिक रोपे, फुल झाडे या पार्कमध्ये असून लहान मुलांपासून तरूण, जेष्ट सर्वांसाठी पार्कमध्ये फिरण्याची सोय आहे. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, जेष्ठाना चालण्यासाठी जॉगींग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटींग यार्ड, लॉन टेनीस, व्हॉलीबॉल कोर्ट देखील पार्कमध्ये आहे. योगा, ध्यान धारणेसाठी देखील स्वतंत्र सोय येथे आहे.
येथे असलेल्या पाणवठ्यावर अनेक पक्षी येत असतात. त्यांचा किलबिलाट एकताना मनावरील शीण सहज दूर होईल. एक मोठे ओपन एम्पीथिएटर देखील येथे आहे, जेथे नैसर्गिक वातावरणात मनोरंजन होऊ शकेल. पार्कमध्ये फिरताना भूक लागली तर, कॅफेटेरीया, शौचालय यांची देखील सोय करण्यात आली आहे. एकूण पार्कचा परिसर पाहताना भविष्यात येथे अनेक शाळांच्या सहली, पर्यावरणविषयक सहली आयोजित करता येऊ शकतील.
या उद्यानाच्या जागेतील पूवीर्ची झाडे, वृक्ष याना धक्का न बसवता त्यांचाही वापर पार्कमध्ये करून हे उदयान फुलवण्यात आले आहे. एका पुरातन वटवृक्षाच्या सावलीत उभारलेले ट्री गार्डन तर बच्चे कंपनीसाठी खेळण्याची फेवरेट डेस्टीनेशन ठरणार आहे. अनेक फुलझाडे येथे असल्याने फुलपाखरांच्या शेकडो प्रजाती या उद्यानात आनंदाने बागडताना दिसतील. हा सेंट्रल पार्क न्यूयार्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क व लंडनच्या हाईड पार्कच्या तसेच शिकागोच्या लिन्कॉलीन उद्यानाच्या संकल्पनेवर आधारीत केला असल्याने शहराच्या मध्ये एक सुंदर पर्यावरणस्नेही जंगलच उभे राहिलेले आहे.
वैशिष्ट्ये..
- २०.५ एकरवर (82890 चौरस मीटर) पार्कवरील ठाण्यातील सर्वात मोठे उद्यान
- प्रतिष्ठित न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हायड पार्क आणि शिकागोच्या लिंकन पार्कपासून प्रेरणा
- ३५०० पेक्षा जास्त झाडे आणि वनस्पतींपासून दरवर्षी ८,८४,००० लाख पौंड ऑक्सिजन तयार करणे
- जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविध हे उद्यान हिरवे अभयारण्य म्हणून काम करते, पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० पेक्षा जास्त प्रजातींचे होस्ट करते.
- जैवविविधता संवर्धनाला प्रोत्साहन देते, मोरोक्कन, चायनीज, जपानी आणि मुघल रचनांनी प्रेरित थीम गार्डन्स, सर्वात मोठी खुली आणि हिरवीगार जागा, आकर्षणांमध्ये एक ट्रीहाऊस, ३-एकरांचे विस्तीर्ण तलाव आणि भारतातील सर्वात मोठ्या स्केटिंग पार्क उद्यानांत यांचा समावेश झाला आहे.