ठाकुर्लीत १० मिनिटे सिग्नल फेल झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 03:21 PM2018-02-26T15:21:54+5:302018-02-26T15:21:54+5:30
ठाकुर्ली स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाल्याच्या समस्येमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनूसार ही समस्या १० मिनिटेच उद्भवली असली तरी त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. चारही मार्गावरील वाहतूक लोकल कोंडीमुळे अर्धा तास बंद होती, तर त्यानंतर बराच वेळ संथगतीने लोकल धावल्या.
डोंबिवली: ठाकुर्ली स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाल्याच्या समस्येमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनूसार ही समस्या १० मिनिटेच उद्भवली असली तरी त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले. चारही मार्गावरील वाहतूक लोकल कोंडीमुळे अर्धा तास बंद होती, तर त्यानंतर बराच वेळ संथगतीने लोकल धावल्या.
ठाकुर्ली स्थानकादरम्यान कि.मी. ५१ दरम्यानच्या पोलनजीकचा सिग्नल फेल झाल्याची घटना घडली, त्यामुळे लोकल थांबल्या, अप-डाऊन दोन्ही मार्गावरी रेल्वे सेवा या गोंधळामुळे प्रभावित झाली. लोकल जागच्या हालत नसल्याने प्रवाशांनी ठाकुर्ली, कल्याण, डोंबिवलीसह अनेक ठिकाणी जागा मिळेल तेथे लोकलमधून उतरुन पटरीतून प्रवास केला. ठाकुर्ली, कल्याणच्या प्रवाशांनी रस्ता वाहतूकीचा पर्याय स्विकारत मार्ग काढला, तर डोंबिवली मार्गावरील प्रवाशांनी स्थानक गाठणे पसंत केले.
दुपारी २.१५ ते दुपारी २.२५ पर्यंत हा घोळ सुरु होता, त्यानंतर सिग्नल यंत्रणा पूर्ववत झाली. पण लोकल कोंडीमुळे समस्या अधिक तीव्र झाली, परिणामी दुपारच्या सत्रातील वेळापत्रक सपशेल कोलमडले. तीन लांबपल्याच्या गाड्यांनाही काहीसा विलंब झाला. त्यामुळे कल्याणसह ठाकुर्ली, डोंबिवली व अन्य स्थानकात नेहमीपेक्षा दुपार असूनही प्रवाशांची गर्दी झाली होती.
आधीच उकाडा वाढल्याने प्रवासी हैराण असतांनाच रेल्वे ट्रॅकमध्ये उतरुन प्रवाशांना प्रवास करावा लागला. तळपत्या उन्हार ट्रॅक पार करतांना प्रवाशांमध्ये रेल्वेच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रचंड संताप व्यक्त झाला. बारावीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा दुपारी संपली होती, त्यामुळे त्या परिक्षार्थिंना परिक्षेला जाण्यासाठी त्रास झाला नसला तरी घरी परततांना जे हाल झाले, त्यामुळेही विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.