६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 06:40 PM2024-05-30T18:40:09+5:302024-05-30T18:44:39+5:30
मध्य रेल्वेने ठाण्याला ६३ तासांचा, सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक घेण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत.
Central Railway Megablock :मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुक्रवारपासून रविवारी दुपारपर्यंत मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्मची रुंदी वाढण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल ट्रेनच्या सेवेवर आणि लाखो प्रवाशांवर याचा परिणाम होणार आहे. या ब्लॉकच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवश्यकता असेल तरच लोकलने प्रवास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या कामामुळे सामान्य प्रवाशांना नेमका काय फायदा होणार आहे?
ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाच आणि सहाचे मॉड्युलर फलाटाच्या मदतीने रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी ६२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत या फलाटांवरुन प्रवाशांना प्रवास करता येणार नाही.तर सीएसएमटी स्थानकावरील १० आणि ११ फलाट क्रमांकावरील कामासाठी ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून हे फलाट प्रवाशांसाठी बंद असणार आहेत. या कामाचा परिणाम जवळपास ३३ लाख प्रवाशांवर होणार आहे.
३ दिवस महा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर गुरुवारी मध्यरात्री पासून घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकचा प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मध्य रेल्वेवरील ३१ मे, १ आणि २ जून रोजीच्या ब्लॉकमुळे एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. शुक्रवारी १६१, शनिवारी ५३४, रविवारी २३५ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लांब पल्ल्यांच्या ७२ गाड्यांवर देखील याचा परिणाम होणार आहे.
नेमका काय फायदा होणार?
ठाणे स्थानकावरुन रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळपास ही पाच लाख आहे. ठाणे स्थानकाच्या पाच आणि सहा क्रमांकाच्या फलाटांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे पाच आणि सहा या फलाटांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. ठाणे स्थानकावरील फलाटाच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी रात्रीपासून ते रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाट क्रमांक पाचवरुन कर्जत, कसाराच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल आणि मेल, एक्सप्रेस गाड्या धावतात. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा स्थानकावर जाण्यासाठी प्रवासी याच प्लॅटफॉर्मवर येत असतात. तर सहा नंबरच्या फलाटावर मुंबईकडे येणाऱ्या जलद लोकल आणि मेल, एक्सप्रेस गाड्या थांबतात. यामुळे लोकल प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासी अशा दोघांची गर्दी दोन्ही फलाटांवर प्रचंड प्रमाणात असते. गर्दीमुळे कधीकधी चेंगराचेंगरी देखील होत असते.
त्यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी आणि कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने या दोन्ही फलाटांची रुंदी १० मीटरवरुन १३ मीटर करण्याचा निर्णय घेतलाय. या फलाटांची रुंदी वाढल्याने प्रवाशांना तिथे उभं राहण्यास आणखी जागा मिळणार आहे. तसेच रेल्वेला गर्दीवर नियंत्रण देखील ठेवता येणार आहे.
दरम्यान, ठाणे स्थानकात क्षमता वाढवण्यासाठी आणि गर्दीची शक्यता कमी करण्यासाठी फलाट क्रमांक पाच आणि सहाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाला साधारणत: सहा महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु या ब्लॉक कालावधीत मॉड्युलर प्री-कास्ट ब्लॉक्स वापरून काम करण्यात येणार असल्याने हे काम केवळ अडीच दिवसांत पूर्ण होणार आहे.