प्रवाशांचा छळ मांडणारी मध्य रेल्वे रामभरोसे; इंडिकेटरचा, लोकलच्या वेळांचा गोंधळही कायमचाच 

By संदीप प्रधान | Published: June 27, 2024 10:16 AM2024-06-27T10:16:05+5:302024-06-27T10:17:13+5:30

फलाटांवर बसायची पुरेशी व्यवस्था नाही; इंडिकेटरचा, लोकलच्या वेळांचा गोंधळही कायमचाच 

Central Railway Rambharose for Harassing Passengers Confusion of indicator, local times also forever  | प्रवाशांचा छळ मांडणारी मध्य रेल्वे रामभरोसे; इंडिकेटरचा, लोकलच्या वेळांचा गोंधळही कायमचाच 

प्रवाशांचा छळ मांडणारी मध्य रेल्वे रामभरोसे; इंडिकेटरचा, लोकलच्या वेळांचा गोंधळही कायमचाच 

संदीप प्रधान

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मागील जन्मावर वैज्ञानिक दृष्टी असलेला कुठलाही माणूस विश्वास ठेवणार नाही; परंतु मध्य रेल्वेच्या बेजबाबदार, बेमुरवतखोर व बेशरम कारभाराचा दररोज सामना करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला मागील जन्मी केलेली पातके फेडण्याकरिता आपल्याला मध्य रेल्वेच्या वेठीस बांधल्याचा दृढ विश्वास आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मध्य रेल्वेला कानपिचक्या दिल्या असल्या तरी गेंड्याची कातडी असलेल्या या व्यवस्थेवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. 

फलाट असो की रेल्वेचे डबे, स्वच्छतागृहे असो की बसायची बाकडी, जिने असो की तिकीट खिडक्या मध्य रेल्वेची कुठलीही व्यवस्था ही चालवणारी एखादी सक्षम यंत्रणा अस्तित्वात आहे, याचा विश्वास मनात उत्पन्न होत नाही. सारे काही रामभरोसे सुरू आहे, असे सतत वाटत राहते. रेल्वेच्या फलाटांवर बसायची पुरेशी व्यवस्था नाही. जी आहे त्यावर अनेकदा भिकारी, गर्दुल्ले बसलेले असतात. रेल्वे पोलिस व भिकारी यांच्यात काही देवाणघेवाण होत असल्याखेरीज फलाट त्यांना आंदण दिले जात नाही, असा प्रवाशांना दाट संशय आहे. 

रेल्वेनी फलाटांवर दोन पद्धतीचे इंडिकेटर बसवले आहेत. त्यावर दोन वेगवेगळ्या गाड्यांच्या वेळा दाखवलेल्या असतात. त्यामुळे शहरात नव्याने आलेल्या प्रवाशाला समोर आलेल्या लोकलमध्ये बसून ईप्सितस्थळी उतरेपर्यंत आपण नेमक्या कुठल्या लोकलने प्रवास केला, याचा थांगपत्ता रेल्वे प्रशासन लागू देत नाही. अमुक एका फलाटावरील प्रवाशांनी दूर उभे राहावे एक जलद लोकल जात आहे, अशी सूचना सुरू असतानाच प्रवासी ज्या लोकलची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत तीच फलाटावर येऊन उभी करण्याचे जादूचे प्रयोग केवळ मध्य रेल्वे करते.

भुर्दंड पडण्याचा चोख बंदोबस्त
बृहन्मुंबईत देशभरातून लोक येतात. प्रवाशांना कुठले स्थानक येणार याची पूर्वसूचना देण्याकरिता मध्य रेल्वेने डब्यांत इलेक्ट्रॉनिक इंडिकेटर बसवलेत. अनेकदा त्यावर ठाणे स्थानक आले असताना कळवा किंवा मुलुंड असे दाखवले जाते. ज्याला कुठले स्टेशन कोणते हे माहीत नाही त्याची फसगत होऊन त्याला भुर्दंड पडण्याचा चोख बंदोबस्त रेल्वे करते.

अनेकदा सरकता जिना मध्येच बंद पडतो
मध्य रेल्वेने महिला, वृद्ध यांच्याकरिता सरकते जिने बसवले आहेत; परंतु त्यावर पाऊल ठेवायला तेच कचरतात. माघारी फिरतात. यातून मोठा अपघात संभवतो. अनेकदा सरकता जिना मध्येच बंद पडतो. अशा वेळी वृद्ध पडायची भीती असते. ज्यांना जिने चढायचे नाही अशा आजारी प्रवाशांना जिना पुन्हा पटकन सरकू लागेल, अशी भीती मनात बाळगत जिने चढायला भाग पाडण्याची शिक्षा मध्य रेल्वे देते. 

हा विकृत आनंद ‘मरे’च घेऊ शकते

  • जलद मार्गावरील लोकल उशिरा धावत असल्याची उद्घोषणा होताच दीर्घकाळ लोकलची वाट पाहणारे शेकडो प्रवासी एकतर जिन्याच्या दिशेने धावत धिम्या मार्गावरील येताना दिसणारी लोकल पकडण्याकरिता धडपडतात किंवा रेल्वे मार्गात उडी मारून धिम्या मार्गाचा फलाट गाठण्याचा प्रयत्न करतात. 
  • जिवाच्या आकांताने जलद मार्गावरील प्रवाशांनी पकडलेली धिमी लोकल जेमतेम फलाट सोडून निघते ना निघते तोच जलद मार्गावरील लोकल येत असल्याची घोषणा होते व लोकल येऊन उभी राहते. 
  • त्यामुळे धिमी लोकल प्रवाशांनी गच्च भरलेली तर जलद लोकलला तुरळक प्रवासी असा विरोधाभास उत्पन्न होतो. प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा हा विकृत आनंद केवळ मध्य रेल्वेच घेऊ शकते.

Web Title: Central Railway Rambharose for Harassing Passengers Confusion of indicator, local times also forever 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.