पावसामुळे मध्य रेल्वेचा वेग मंदावला : ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 04:47 PM2018-06-09T16:47:08+5:302018-06-09T16:49:02+5:30
शनिवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहाटे कसा-याच्या दिशेने धावणा-या कसारा गाडीसह उपनगरिय लोकल पहाटेपासूनच बाधित झाल्या. काही लोकल ठाणे स्थानकात रद्द केल्यानेही प्रवाशांचे हाल झाले. या गोंधळामुळे वेळापत्रक ४० मिनिटे विलंबाने धावले, पण लोकल सेवा र्पूर्णपणे बंद न झाल्याचे प्रवाशांमध्ये समाधान होते.
डोंबिवली: शनिवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पहाटे ६ वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहाटे कसा-याच्या दिशेने धावणा-या कसारा गाडीसह उपनगरिय लोकल पहाटेपासूनच बाधित झाल्या. काही लोकल ठाणे स्थानकात रद्द केल्यानेही प्रवाशांचे हाल झाले. या गोंधळामुळे वेळापत्रक ४० मिनिटे विलंबाने धावले, पण लोकल सेवा र्पूर्णपणे बंद न झाल्याचे प्रवाशांमध्ये समाधान होते.
मुंबईमध्ये पावसाची जोर कायम होता, त्यामुळे कुर्ला-सायन भागात रेल्वे रूळांमध्ये पाणी साठल्याने त्याचा परिणाम ठाणे जिल्ह्यातील लोकल सेवेवर झाला. ठाणे, दिवा मार्गावर लोकलचे बंचिंग( एकामागोमाग रांग) झाले होते. त्यामुळे सकाळपासून मुंबईला जाणा-या चाकरमान्यांचे हाल झाले. कल्याण-ठाणे प्रवासाला ऐरव्ही २५ मिनिटे धीम्या तर १८ मिनिटे जलद मार्गावरील अप-डाऊन लोकल प्रवासाठी लागतात, पण शनिवारच्या गोंधळामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात अर्धा ते पाऊण तास लागला. वेळापत्रक कोलमडल्याने ठाणे स्थानकात काही लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ठाणे, दिवा, डोंबिवली कल्याण, अंबरनाथ, बदलापूर तसेच टिटवाळा, आसनगाव स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.
हीच स्थिती दुपारी, संध्याकाळ चार पर्यंत उद्भवली. सायन-कुर्ला मार्गावर पाणी साठल्याने मुंबई-दादरहून निघालेल्या लोकल डाऊनमार्गे कासवगतीने धावल्या, घाटकोपर-ठाण्यापर्यंत गाड्यांचा वेग मंदावलेला होता. ठाणे स्थानकात दुपारी ३ ते ४ या वेळेत केवळ धीम्या मार्गावरील फलाट क्रमांक ४ वरुनच मुंबईच्या दिशेने धावल्या, तर फलाट १ वरुन मुंबईसाठी लोकल सोडल्याच नाहीत अशी माहिती प्रत्यक्षदर्शी जितेंद्र विशे या प्रवाशाने दिली. लोकल गाड्या रद्द होणे, वेग मंदावणे यामुळे दुपारनंतर घरी परतणा-या चाकरमान्यांमुळे गाड्यांना प्रचंड गर्दी झाली होती. मुंबईच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेत प्रवाशांनी दुपारनंतर तातडीने घरी परतण्याचा निर्णय घेतला, त्यामुळेही दुपारच्या वेळेत गर्दी झाली होती. सकाळी मुंबईला काही लोकल न पोहोचल्याचा परिणाम संध्याकाळच्या वेळापत्रकावर झाला. रात्रीपर्यंत दोन्ही मार्गावरील लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा वेळेनूसार धावत होती. या गोंधळामुळे लांबपल्याला जाणा-या गाड्यांच्या वेळापत्रक फारसे प्रभावित झाले नाही. अप-डाऊन मार्गावर गाड्या शनिवारी वेळेत धावल्याने त्या गाड्यांनी जाणा-या प्रवाशांना दिलासा मिळाला.
* मुंबईत होणा-या पावसासंदर्भात नागरिकांना आधीपासूनच कल्पना होती, त्यातच दुसरा शनिवार असल्याने लोकल प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी कमी होती. लोकलचा वेग मंदावलेला असला तरी लोकल सुरु होत्या. - माणिक साठे, पोलीस निरिक्षक-कल्याण