ठाणे रेल्वेस्थानकावरील पार्किंगमधून मध्य रेल्वेला मिळणार २.६८ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 01:32 AM2020-02-08T01:32:39+5:302020-02-08T01:33:09+5:30
मध्य रेल्वेच्या स्थानकांमध्ये ठाण्यातून सर्वाधिक उत्पन्न
ठाणे : ठाणे रेल्वेस्थानक हे वाहन पार्किंगमधून सर्वाधिक उत्पन्न देणारे मध्य रेल्वेवरील स्थानक ठरणार आहे. यात मुंबई आणि इतर उपनगरीय रेल्वेस्थानकांना ठाणे स्थानकाने मागे टाकले आहे. एका वर्षाला ठाणे रेल्वेस्थानकाच्या आवारातील पार्किंगमधून दोन कोटी ६८ लाखांचे घसघशीत उत्पन्न मध्य रेल्वेला मिळणार असून, यासंदर्भातील कंत्राटाला रेल्वे प्रशासनाने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे.
ठाणे रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे. पश्चिमेकडे तळ अधिक एक मजली इमारतीची तीन हजार ३५२ चौरस फूट जागा असून तिथे जवळपास दोन हजार ५०० वाहने उभी राहतात. पूर्वेकडे दोन हजार ५०० चौरस फूट जागा असून तिथे एक हजार ७०० वाहने उभी करण्याची क्षमता आहे. पश्चिमेकडील तळमजल्यावर सशुल्क, तर पहिल्या मजल्यावर मोफत पार्किंग सुरू आहेत. मध्यंतरी, रेल्वे प्रशासनाने दोन्ही पार्किंगचे व्यवस्थापन आणि देखभालीसाठी तीन वर्षांसाठी निविदा मागवल्या होत्या.
त्यानुसार, ठाणे पश्चिमेकडील तळ आणि एक मजल्यावरील वाहन पार्किंग १.५६ कोटीला, तर पूर्वेकडील १.१२ कोटीला प्रत्येकी एक वर्षासाठी दिली आहे. पश्चिमेकडील पार्किंगपोटी तीन वर्षांसाठी ४.६९ कोटी, तर पूर्वेकडील ३.३६ कोटींना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पार्किंगसंदर्भात आकारण्यात येणारे दरही इतर शहरांपेक्षा कमी असल्याचे रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे स्थानकाच्या पश्चिमेकडील पार्किंग प्लाझाच्या पहिल्या मजल्यावर वाहनांसाठी मोफत पार्किंगची सुविधा आहे. मात्र पार्किंगचे कंत्राट मंजूर केल्याने आता ती सुविधा बंद होणार आहे. त्यामुळे लवकरच पहिल्या मजल्यावरही पार्किंगसाठी पैसे आकारण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.