ठाण्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय शीघ्र कृती दलाची कुमक
By जितेंद्र कालेकर | Published: May 26, 2020 12:14 AM2020-05-26T00:14:27+5:302020-05-26T00:18:47+5:30
पोलिसांवर बंदोबस्ताचा वाढणारा ताण कमी करण्यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट आणि ठाणे शहर या दोन परिमंडळांमध्ये केंद्रीय शीघ्र कृती दलाची एक कंपनी सोमवारपासून तैनात करण्यात आली आहे.जमावबंदीचा आदेश मोडणारे, गर्दी करणारे तसेच जमाव करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांवर बंदोबस्ताचा वाढणारा ताण कमी करण्यासाठी ठाण्यातील वागळे इस्टेट आणि ठाणे शहर या दोन परिमंडळांमध्ये केंद्रीय शीघ्र कृती दलाची एक कंपनी सोमवारपासून तैनात केली आहे. या कंपनीने हाजूरी आणि मुंब्रा या दोन भागांमध्ये पथसंचलन करुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
एकीेकडे मुंब्रा आणि वागळे इस्टेट परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यातच कारवाईसाठी सरसावलेल्या आणि बंदोबस्तासाठी ठिकठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनाच कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंत १०४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी एका महिला कॉन्स्टेबलचा मृत्यु झाला. तर ४८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित ५५ पोलिसांवर वेगवेगळया रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. शहरातील अनेक कंटेनमेंट झोन परिसरातही पोलिसांचे संख्याबळ अधिक खर्ची होत आहे. सध्या ७० पेक्षा अधिक पोलिसांना कॉरंटाईन केले आहे. अपु-या संख्येमध्ये कोरोनाचा बंदोबस्त करणाºया स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाचे पोलीस तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांवरही मोठया प्रमाणात ताण वाढला होता. या सर्वच बाबी विचारात घेऊन मुंबईप्रमाणेच ठाण्यातही शीघ्र कृती दलाच्या एका कंपनीची मागणी ठाणे पोलिसांनी राज्य सरकारकडे केली होती. ही १२० जवानांची पहिली फौज सोमवारी पाठविण्यात आली आहे. ठाणे शहर आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांमध्ये प्रत्येकी ६० जवांनाची सशस्त्र फौज तैनात केली आहे. वागळे इस्टेट विभागातील श्रीनगर आणि वागळे इस्टेट या दोन पोलीस ठाण्यांतर्गत आता हे आरएएफचे जवान गस्त घालणार आहेत. जमावबंदीचा आदेश मोडणारे, गर्दी करणारे तसेच जमाव करुन हुल्लडबाजी करणाºयांवर या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. तर ठाण्यातील कळवा विभागातील मुंब्रा भागातही हे पथक करडी नजर ठेवणार आहे. जिथे नियंत्रणाबाहेर जाणारी गर्दी असेल, तिथे या दलाकडून धडक कारवाई केली जाणार आहे. या दलाच्या बंदोबस्तामुळे राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांनाही काही प्रमाणात विश्रांती घेता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘‘ ज्या भागात कोरोनाचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव आढळला आहे. त्या भागातील कंटेनमेंट झोन परिसरात विशेषत: मुंब्रा, राबोडी आणि वागळे इस्टेट या भागात शीघ्र कृती दलाची कुमक तैनात केली आहे. मोठया गर्दीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनाही काही प्रमाणात त्यामुळे दिलासा मिळणार आहे.’’
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर