ठाण्याच्या कासारवडवलीत कोयत्याने वार करून कामगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 07:29 PM2019-05-06T19:29:50+5:302019-05-06T19:41:47+5:30
बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींगचे काम करणा-या गोविंद नामक एका कामगारावर सोमवारी (६ मे ) पहाटेच्या सुमारास कोयत्याने सपासप वार करुन त्याचा खून केल्याची घटना घडली. हत्येनंतर मारेक-याने तिथून पलायन केले असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
ठाणे : हिरानंदानी इस्टेट येथील रेडीमिक्स काँक्रिट प्लान्टच्याजवळील कच्च्या रस्त्यावर अंदाजे ३५ वर्षीय गोविंद या कामगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेटच्या आतील बाजूस असलेल्या या कंटेनरच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर एका अनोळखीने गोविंद या कामगाराला कॉलर धरून ६ मे रोजी पहाटे ३.४५ ते ४ वा. च्या सुमारास ओढत आणले. त्यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर त्याने गोविंदच्या मानेवर लोखंडी कोयत्याने घाव घातला. गंभीर जखमी झाल्यानंतर तो विव्हळत असतांना त्याला पुन्हा काही अंतर त्याने ओढत नेले. नंतर त्याला खाली पाडून त्याच्या मानेवर, डोक्यावर, गालावर आणि हातावर कोयत्याने सपासप वार केले. यात गंभीर जखमी होऊन मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार जवळच असलेल्या एका सुरक्षारक्षकाने पाहिला. त्याने तातडीने याबाबतची माहिती कासारवडवली पोलिसांना दिली. सुरुवातीला त्याची कोणतीच ओळख न पटल्याने त्याचे नावही समजले नव्हते. वडवली गावातील काही मजुरांनी त्याचे नाव गोविंदा असून तो बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रिंगचे काम (गवंडी) करतो, इतकी माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ आदींनी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे अन्वेषण विभागाचे वागळे इस्टेट युनिट तसेच कासारवडवली पोलीस ठाण्याचे शोध पथक या खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.