चांबळे येथील रंगपंचमी उत्सवाला शतकी परंपरा !
By admin | Published: March 17, 2017 05:46 AM2017-03-17T05:46:42+5:302017-03-17T05:46:42+5:30
तालुक्यातील चांबळे गावात गेल्या अनेक वर्षापासून रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी शुक्रवारी ९.३० वाजता ‘येळकोट येळकोट जय मल्हार
वसंत भोईर , वाडा
तालुक्यातील चांबळे गावात गेल्या अनेक वर्षापासून रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी शुक्रवारी ९.३० वाजता ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ हे लोकनाट्य सादर होणार आहे. ते श्री हनुमान प्रासादीक मंडळाने बसविलेले आहे. या नाटकासाठी व्यावसायिक रंगभूमी डोंबिवली यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तर शनिवार दि. १८ मार्च रोजी सकाळी ७.३० वा. ग्राम देवतांची सोंगे काढण्यात येणार आहेत.
दरवर्षी होणाऱ्या रंगपंचमी उत्सवाला व त्यानिमित्ताने स्थानिक कलाकार सादर करीत असणाऱ्या नाटकाला शतकाची परंपरा आहे. रंगपंचमी उत्सव व त्यानिमित्ताने सादर केलं जाणार नाटक, ग्राम देवतांची सोंगे ही परंपरा चार-पाच पिढ्यांपासून अखंडपणे सुरू आहे.
पूर्वी रामायण-महाभारतातील पुराणकथांवर व प्रसंगांवर आधारित दशावतारी नाटके सादर केली जायची. तर त्यानंतर संगीत शाकुंतल, संगीत शारदा, द्रौपदीहरण, संगीत मानापमान यासारखी संगीत नाटके सादर केली जायची. या नाटकात भूमिका करणाऱ्या कलावंतांची पदे ऐकण्यासाठी दूरवरून प्रेक्षक आवर्जून यायचे. स्वातंत्र्यपूर्व काळातील या नाटकांमध्ये ब्रिटीश सत्तेविरोधात असंतोषही प्रकट केला जायचा, हे विशेष!
त्यानंतरच्या ६० ते ८० च्या दशकापर्यंतचा कालखंड हा तमाशा प्रधान नाटके- लोकनाट्यांनी गाजला. अत्यंत दर्जेदार व अभिनय संपन्नतेने सादर केल्या जाणाऱ्या या नाटकांनी गावाला वेगळा लौकीक मिळवून दिला होता. वारणेचा वाघ, डाकू मानसिंग, बंडखोर, चंबळचा डाकू, येळकोट येळकोट जय मल्हार, फकीरा, रक्तसम्राट, यासारखी नाटके त्याकाळी खूपच गाजली. गावातील कलाकारांचा अभिनय ही त्याकाळी खूपच चर्चेचा विषय होता. विशेष म्हणजे ही सर्व नाटके सुसज्ज स्टेज उभारून, संगीत साथीसह व व्यावसायिक रंगभूमीवरील नामवंत स्री कलाकारांना घेऊन सादर केली जायची! मात्र पुरूष कलाकार हे गावातीलच असावेत, हा पायंडा आजतागायत पाळला जातोय.
दुसऱ्या दिवशी गावदेवी, वेताळ, वीरभद्र या ग्राम देवतांची सोंगे काढली जातात. यावेळी सादर होणाऱ्या महिषासूर वधाचे विशेष आकर्षण असते. शतकाची परंपरा असणाऱ्या रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने सादर होणारी नाटके व ग्रामदेवतांची ही परंपरा अखंडीत सुरू ठेवणे हे चांबळे ग्रामस्थांचे वैशिष्ट्ये आहे. तर ग्रामीण कला व संस्कृती जपण्यासाठी तरूणांचा असणारा सहभाग कौतुकाची बाब आहे. विशेष-चांबळे येथील तरूण कलाकार ऋषिकेश शेलार याला आपल्या गावात सादर केलेल्या कलेचा विशेष फायदा झाला त्याने सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात डॉ तात्याराव यांची तरूणपणातील भूमिका साकारली आहे. सध्या ऋषिकेश पुणे येथे अभिनय प्रशिक्षण घेत आहे. येथील कलाकार जयेश शेलार यांनीही अनेक नाटकात विविध भूमिका साकारल्या आहेत ते नाट्यलेखनही करीत आहेत. तर येथील अन्य कलाकार दिनेश दाभणे यांनी व्यावसायिक नाट्य निर्मिती केली आहे.