ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमधील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सीईओ सरसावले!

By सुरेश लोखंडे | Published: June 23, 2024 07:37 PM2024-06-23T19:37:17+5:302024-06-23T19:37:53+5:30

या भेटी दरम्यान सीईओ यांनी संबंधित गावांच्या व जवळच्या महापालिकांच्या डंपिंग ग्राऊंड, घनकचरा प्रकल्प, हायवेलगतच्या कचऱ्याची पहाणी केली.

CEO rushed to dispose of waste in gram panchayats of Thane district! | ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमधील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सीईओ सरसावले!

ठाणे जिल्ह्यातील ग्राम पंचायतींमधील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी सीईओ सरसावले!

ठाणे : जिल्ह्यातील शहरांजवळच्या व महामार्गाच्या बाजूला असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा ही समस्या गंभीर झाली आहे. त्यावर वेळीच उपाययाेजना करण्याची गरज हेरून ठाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी भिवंडी, कल्याण, शहापूर, अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन या कचरा समस्येचे गांभीर्य जाणून घेत त्यावर वेळीच उपाययाेजना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

             या भेटी दरम्यान सीईओ यांनी संबंधित गावांच्या व जवळच्या महापालिकांच्या डंपिंग ग्राऊंड, घनकचरा प्रकल्प, हायवेलगतच्या कचऱ्याची पहाणी केली. या कचऱ्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन घनकचरा व्यवस्थापन, कचऱ्याचे विविध प्रकारे विल्हेवाट करण्यासाठी ग्रामस्थांनी देखील पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा घुगे यांनी या भेटी दरम्यान गांवांमधील रहिवाश्यांकडून केली आहे. या दाैर्या प्रसंगी घुगे यांनी भिवंडी तालुक्यातील हायवे लगतच्या दिवे अंजुर, मानकोली, वडपे, पडघा आणि कोण या ग्रामपंचायतींना भेट दिली.

             शहापूर तालुक्यातील बोर शेती, वाफे आणि चेरपोली ग्रामपंचायत भेट देऊन तेथील डम्पिंग ग्राउंडची पहाणी केली. शहापूर तालुक्यातील दहिगाव येथील जेएसडब्ल्यू अंतर्गत कार्यरत असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास देखील त्यांनी भेट दिली. यावेळी प्रकल्प संचालक अतुल पारस्कर, भिवंडीचे बीडीओ डॉ. प्रदीप घोरपडे, उप अभियंता रमेश सासे आदी उपस्थित होते.

             कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप ग्रामपंचायतींलाही घुगे यांनी भेटी देऊन येथील नाला सेतू ट्रीटमेंट प्लांटचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. वरप ग्रामपंचायत अंतर्गत तात्काळ कचरा संकलन केंद्र उभारणीसाठी नियोजन करण्यात यावे अशा सूचना गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांना देण्यात आल्या. अंबरनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत नेवाळी व उसाटणे येथे भेट देण्यात आली. उसाटणे येथील कचरा व्यवस्थापन केंद्राचे कामकाज वेळेत पूर्ण करावे असे आदेश देण्यात आले. ग्रामपंचायत नेवाळी येथे घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नेवाळी नाका येते कचरा टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सुचना देण्यात आल्या.
 

 

 

Web Title: CEO rushed to dispose of waste in gram panchayats of Thane district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.