सीईटीची वेबसाईट बंद, पण तयारी झाली का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:42+5:302021-07-26T04:36:42+5:30
स्नेहा पावसकर ठाणे : यंदा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागणार आहे. मात्र, सीईटीची वेबसाईटच बंद झाल्याने ...
स्नेहा पावसकर
ठाणे : यंदा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी सीईटी द्यावी लागणार आहे. मात्र, सीईटीची वेबसाईटच बंद झाल्याने सीईटी परीक्षेसाठीची प्रक्रिया रखडलेलीच आहे. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी वेबसाईट कधी सुरू होईल आणि आपल्याला प्रवेश मिळेल की नाही, या चिंतेत आहेत.
कोरोनामुळे यंदा दहावीची प्रत्यक्ष लेखी परीक्षा झाली नाही. त्यामुळे निकषाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला गेला. त्यामुळे यंदा अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण घटले हे खरे. पण यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अधिक चुरस पाहायला मिळू शकते. हेच लक्षात घेता शासनाने अकरावी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले. मात्र, त्या प्रवेश नाेंदणीची वेबसाईटच बंद पडल्याने अनेक विद्यार्थ्यांना अद्याप नाेंदणी करता आलेली नाही. त्यामुळे जून महिना संपत आला, कधी ही वेबसाईट सुरू होणार, कधी नाेंदणी करणार? कधी परीक्षा होणार? याचे टेन्शन विद्यार्थ्यांना आहे. विद्यार्थ्यांनी वेबसाईटचे टेन्शन न घेता परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञांनी केले आहे.
--------------
सीईटी वेबसाईट हँग
अकरावी प्रवेशाची सीईटी ही ऐच्छिक असली तरी प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या काॅलेजला प्रवेश मिळवण्याची इच्छा असते. त्यामुळे अनेक विद्यार्थी सीईटीसाठी नाेंदणी करण्याची शक्यता आहे. त्यानुसार सीईटीच्या नोंदणीसाठीची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच ही साईट बंद केली.
-------------
सीईटीची तयारी करा
वेबसाईट बंद झाली, यात शासनाचा ढिसाळ कारभार दिसतोच. पण विद्यार्थी आणि पालकांनी त्रस्त न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. परीक्षा तर होईलच, असे वाटते. त्यामुळे मिळालेल्या वेळात सीईटीची तयारी करावी, असा सल्ला काही शिक्षणतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.