भिवंडीतील पडघा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात साखळी उपोषण
By नितीन पंडित | Published: July 2, 2024 04:11 PM2024-07-02T16:11:12+5:302024-07-02T16:11:26+5:30
या आंदोलनात उपाध्यक्ष डॉ. पवन महाजन, अशफाक शेख, सचिव जयेश जाधव, खजिनदार मनोज गुंजाळ आदी सहभागी झाले होते.
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील झपाट्याने नागरीकरण होत असलेल्या पडघा ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध समस्यांविरोधात ग्रामविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पडघा ग्रामपंचायत कार्यालया बाहेर लाक्षणिक साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात उपाध्यक्ष डॉ. पवन महाजन, अशफाक शेख, सचिव जयेश जाधव, खजिनदार मनोज गुंजाळ आदी सहभागी झाले होते.
ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय गुरुचरण जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश असताना सुद्धा ग्रामसेवक तथा ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नाही. ग्रामपंचायत हद्दीत जमा होणारा बाजार कर मागील पाच वर्षे शासकीय नियमाप्रमाणे ग्रामपंचायत बँक खात्यात नियमित भरणा न करता त्या मध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केल्याने संबंधितांवर आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे नोंदविण्यात यावेत. जल जिवन मिशन योजनेत १४ कोटी रुपये खर्च करून नागरिकांनी पाणी मिळालेले नाही, यासाठी जबाबदार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
पाणी योजनेअंतर्गत दोन पाण्याच्या टाकी फिल्टर प्लांट कार्यान्वयेत असल्याची खोटी माहिती ग्रामपंचायतने कोर्टात दिलेली आहे त्याबद्दल कायदेशीर गुन्हा नोंदवावा, ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग व्यक्तींचा २०१८ ते २०२२ पर्यंतचा निधी देण्यात आलेला नाही, त्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना दिव्यांगणा प्रलंबित निधी मिळावा अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहील अशी भूमिका ग्रामविकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी व्यक्त केली आहे.