मीरा भाईंदर शहरातील विविध गैरप्रकार व करवाढीविरुद्ध साखळी उपोषण
By धीरज परब | Published: January 7, 2023 03:25 PM2023-01-07T15:25:53+5:302023-01-07T15:27:02+5:30
जिद्दी मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मीरारोड - मीरा भाईंदर शहरातील विविध गैरप्रकार व करवाढीविरुद्ध जिद्दी मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
पालिकेच्या शाळा दहावी इयत्तापर्यंत सुरू करणे व महाविद्यालय सुरू करावे, आयुक्तांनी नव्याने लावलेला पथकर हा नियमबाह्य असून पूर्वी भाजप सत्तेत असताना दोन वेळा करवाढ केली असल्याने १० टक्के रस्ताकर रद्द करावा, गोल्डन नेस्ट जवळील आरक्षण क्र २१४ हे उद्यानासाठी आरक्षित असताना ३ वर्ष उलटून गेले तरी अद्याप ७११ कन्स्ट्रक्शन कंपनी कडून उद्यानाची जागा मोकळी करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. गोल्डन नेस्ट आराखड्यात दर्शवल्याप्रमाणे अंतर्गत रस्त्यावर अतिक्रमण करून माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी स्वतःच्या राहत्या घराचे गार्डन, कार्यालय आदी बेकायदेशीर बांधकामना पालिका संरक्षण देत आहे. सदर बांधकामे हटवून नागरिकां करिता रस्ता मोकळा करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. नयानगरमधील रॉयल अपार्टमेंट मध्ये आपत्ती वेळेसाठी मोकळ्या ठेवलेल्या जागेत तसेच अन्य बेकायदा बांधकामवर कारवाई केली जात नाही.
तर जेसलपार्क येथील अग्निशमन केंद्राच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम व कब्जा अजूनही पालिकेने हटवला नाही, आरजी जागेत बांधकामे केली असताना अजून विकासक ओस्तवाल बिल्डर वर कारवाई केलेली नाही. अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे सह संबंधितांवर कारवाई केली जात नाही. शहरात १५० डान्सबार - लोजिंग, पब तसेच टर्फ बनवून लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. प्रशासनाकडून हफ्ते घेऊन संरक्षण दिले जाते. बुद्धविहार हा जनतेसाठी बनवलेला असताना दिवसाचे भाडे २५ हजार आहे आणि इतर सभागृह व वास्तूंचे भाडे पालिकेने वाढवले आहे ते कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आमदार गीता जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरुण कदम, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर , जयराम मेसे , सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता आदींनी आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत वा समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार असा इशारा संस्थेचे प्रदीप जंगम यांनी दिला आहे .