खड्ड्यांविरोधात साखळी; डम्पिंग समस्येकडेही वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:21 PM2019-11-17T23:21:30+5:302019-11-17T23:21:49+5:30
जागरूक नागरिक संघटनेचे आंदोलन
कल्याण : रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या प्रक्रियेत केवळ तात्पुरती मलमपट्टी करून नागरिकांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ रविवारी येथील जागरूक नागरिक संघटनेतर्फे मानवी साखळी करून केडीएमसीविरोधात आंदोलन करण्यात आले. मोहम्मद अली चौक ते शिवाजी चौक अशी मानवी साखळी करण्यात आली होती. यात खड्ड्यांच्या मुद्द्यासह आधारवाडी डम्पिंगचा विषयही उपस्थित करण्यात आला होता. दररविवारी मानवी साखळी आंदोलन महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी छेडले जाणार आहे.
खड्ड्यांच्या मुद्द्यांकडे जागरूक नागरिक संघटना वर्षभर आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधत आहे. एकीकडे बहुतांश रस्ते सुस्थितीत नसताना रस्त्यावरील एक खड्डा बुजवण्यासाठी २२ हजार रुपये खर्च केल्याचे महापालिका सांगत आहे. एक वर्ष होऊनही काहीच फरक पडत नसल्याने मानवी साखळी आंदोलन छेडण्यात आल्याचे संघटनेचे श्रीनिवास घाणेकर यांनी सांगितले. कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आजही निकाली निघालेला नाही. बाहेरील कचरा कल्याण पश्चिममध्ये आणला जात आहे. त्यालाही आमचा विरोध आहे. यासंदर्भात आंदोलन छेडूनही प्रशासनाने ठोस कृती केलेली नाही. कल्याणमधील आंदोलनात नागरिकांसह व्यापारी, डॉक्टर, साहित्यिक, इंजिनीअर, वकील, सैन्यातील अधिकारी आदी विविध क्षेत्रांतील व्यक्तींनीही सहभाग घेतला होता. कल्याणकरांना भेडसावत असलेल्या समस्या तातडीने सोडवा, अशी मागणी करण्यात आली.
पुढच्या रविवारी डोंबिवली पूर्वेत आंदोलन
१५ कोटी रुपये खर्चूनही रस्ते खड्डेमय राहिले आहेत. दुसरीकडे वारेमाप कर वसूल केला जात आहे. पण सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. यासाठी एखादे जनआंदोलन उभे राहिले पाहिजे, यातून समस्यांबाबत जनजागृतीही होणे आवश्यक आहे.
आठवड्यातील दररविवारी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. पुढच्या रविवारी डोंबिवली पूर्वेत हे आंदोलन केले जाणार असल्याची माहितीही घाणेकर यांनी दिली.