लोकलमध्ये चाकूहल्ला; २४ तासांत एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 04:49 AM2019-01-20T04:49:19+5:302019-01-20T04:49:51+5:30
ठाणे : दिवा-मुंब्रा या धावत्या लोकलप्रवासात अमोल सिंगने (२०) सुधीर मंडल (२१) याच्या पोटात चाकू खुपसून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
ठाणे : दिवा-मुंब्रा या धावत्या लोकलप्रवासात अमोल सिंगने (२०) सुधीर मंडल (२१) याच्या पोटात चाकू खुपसून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अमोलला २४ तासांत वागळे इस्टेट येथून अटक केल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली. अमोल हा रिक्षाचालक आहे.
शुक्रवारी रात्री साडेदहा ते ११ वाजण्याच्या सुमारास बिगारी काम करणारा सुधीर आणि त्याच्या दोन साथीदारांचे अमोलसोबत पाणी भरण्यावरून भांडण झाले. त्यावेळी धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर, सुधीर हा साथीदारांसह लाकडी दांडे घेऊन जाब विचारण्यासाठी अमोलच्या घरी गेला होता. त्यांना पाहून घराचा दरवाजा न उघडता घराच्या पाठीमागील खिडकीतून उडी टाकून अमोलने दिवा रेल्वेस्थानकात धाव घेतली. त्यावेळी त्यांनी त्याचा पाठलाग केला.
त्यांना पाहून तो सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बसला. तो लोकलमध्ये बसत असल्याचे पाहून ते तिघेही त्याच लोकलच्या डब्यात चढले. त्यांनी भांडणाचा जाब विचारताच त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यातून अमोलने घरून आणलेला चाकू सुधीरच्या पोटात खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न करून तेथून पळ काढला.
जखमीने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी अमोल यास शनिवारी दुपारी अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.