नवीन ठाण्याच्या विकासाचे यंत्रणांपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:16 AM2019-03-11T00:16:25+5:302019-03-11T00:16:47+5:30
घोडबंदरपासून अवघ्या १७ किमी अंतरावर नवीन ठाणे विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलली जात आहेत.
खाडीपलीकडच्या गावांचा होणार विकास
घोडबंदरपासून अवघ्या १७ किमी अंतरावर नवीन ठाणे विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर पावले उचलली जात आहेत. अगदी खाडीपलीकडे असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या महसुली गावांचाही विकास केला जाणार आहे. नवीन ठाण्याच्या विकासाच्या मार्गातील एकएक अडथळा टप्प्याटप्प्याने दूर करण्यासाठी राज्य पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार महापालिका आणि एमएमआरडीए या भागात कोणकोणती विकास कामे करणार आहेत, त्याच्यावर प्रकाशझोत टाकणे अगत्याचे ठरते.
अलिबाग ते वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडोर
एमएमआरडीएमार्फत अलिबाग ते वसई विरार असा मल्टिमोडल कॉरिडोर उभारल्या जात असून, तो नव्या ठाण्यातील खारबाव या गावातून जातो. हा कॉरिडोर घोडबंदर रोड ते मोगरपाडा येथील ४० मीटर डिपी रस्त्याने जोडण्याची तरतूद एमएमआरडीएच्या विकास आराखड्यात आहे. त्यामुळे नवीन ठाणे अगदी जवळ येणार आहे. विशेष म्हणजे, या नवीन ठाण्याच्या दिशेने मल्टीमोडल कॉरीडॉर जात असल्याने आजूबाजूचे सर्व महामार्ग जवळ येणार आहेत. या शहरासाठी ही सर्वात महत्वाची जमेची बाजू ठरणार आहे.
एमएमआरडीए निर्माण करणार रोजगाराच्या संधी
महापालिका घरे उभारणार असली, तरी एमएमआरडीए येथे १६ लहानमोठी ग्रोथ सेंटर निर्माण करणार आहे. याशिवाय एमएमआरडीएच्या माध्यमातून या भागात रोजगाराच्या संधीसुध्दा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. येथे येणाऱ्या कामगारांच्या निवाऱ्याची जबाबदारी पालिका उचलणार आहे. गोडाऊन झोनमध्ये लॉजिस्टिक पार्क करण्याचेही जवळजवळ निश्चित झाले आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करताना, व्यक्ती राहत असलेल्या घरापासून त्याला पायी जाता येईल (वॉक टू वर्क) अशा ठिकाणी त्याला रोजगार देण्याचा विचार आहे. या भागात २ लाखांच्या आसपास रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे.
खाडीचे पाणी केले
जाणार शुद्ध
येथे वास्तव्यास येणाºया लोकसंख्येला पाणीसुध्दा लागणार आहे. सध्या पाण्याची परिस्थिती फारशी चांगली नसली, तरी चार लाख लोकसंख्येला सुमारे ४०० ते ४५० दशलक्ष लीटर पाण्याची आवश्यकता रोज लागणार आहे. त्यामुळे त्याचे नियोजनही करण्याचा विचार सुरु आहे. यावर पर्याय म्हणजे या शहराला लागूनच ठाण्याची खाडी आहे. याच खाडीतील पाणी शुध्द करुन ते वापरण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्वाचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प या भागासाठी मोठ्या प्रमाणात किफायतशीर ठरणार आहे. याशिवाय वॉटर फ्रन्ट डेव्लपमेंटलासुध्दा या भागात वाव आहे. या शहराला लागून मोठा खाडी किनारा असल्याने वॉटरफ्रन्टलाही मोठ्या प्रमाणात विकासाची संधी उपलब्ध होणार आहे.
नोटबंदीचा फटका वीटभट्टी व्यवसायाला
खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या भागात काही वर्षांपूर्वी १०० हून अधिक वीट भट्टीचे व्यवसाय होते. परंतु नोटबंदी झाली आणि त्याचा सर्वात मोठा फटका येथील स्थानिकांना बसला. वीटभट्टीची संख्या १०० वरुन १० ते १२ वर आली आहे. प्रत्येक वीटभट्टीवर १०० च्या आसपास कामगार रोजदारांची कामे करत होते. परंतु हे कामगारसुध्दा आता बेरोजगार झाले आहेत.
मंदीच्या सावटाखाली सगळीच गावे
नोटबंदीमुळे वीटभट्टी आणि रेती व्यवसायाला फटका बसल्याने येथील सर्वच गावांमध्ये मंदीचे सावट कायम आहे. जमींनीला सहजासहजी ग्राहक मिळत नाही. रोजगाराच्या संधीसुध्दा येथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सुशिक्षित मुलांना रोजगारासाठी भिवंडीतील गोडावून्सवर अवलंबून राहावे लागत आहे. त्याठिकाणी तुम्ही कितीही शिक्षण घेतले, तरी पगार मात्र ७ ते १० हजार एवढाच मिळतो. त्यामुळे रोजगारासाठी मुंबई किंवा ठाण्याला तारेवरची कसरत करुन तरुणांना जावे लागत आहे. येथील भागाला गोडावून झोन म्हणूनही विकसित केले जाणार होते. परंतु हा प्रस्ताव कागदावरुन पुढे सरकलाच नाही. त्यामुळे रोजगाराच्या नवी संधीसुध्दा उपलब्ध झाल्या नाही.
जेटीवर जाण्यासाठी कच्चा रस्ता
येथील बांगलापाडा भागात खाडी किनारी सुंदर, मनमोहक अशी जेटी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी जेटीपासून पुढे अर्धा किमी पर्यंत सिमेंटचा रस्ता तयार आहे. परंतु हायवेपासून आत जातांना जवळ जवळ एक किमीचा रस्ता हा कच्च्या स्वरुपातीलच आहे.
टोरन्टने काढले गावकऱ्यांचे दिवाळे
आधी या गावातील रहिवाशांना विजेचे बील हे माफक येत होते. परंतु जेव्हापासून येथील विजेचे खाजगीकरण झाले आहे, तेव्हापासून गावकºयांचे दिवाळे निघाले आहे. पूर्वी ५०० ते ७०० रुपयांचे वीज बील यायचे. आजच्या घडीला १५०० ते २ हजारपर्यंत महिन्याचे बील येत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. वीज पुरवठा सुरळीत नसून रोज भारनियमनाच्या झळा येथील रहिवाशांना सोसाव्या लागत आहेत. रोज सकाळी ६ ते १०.३० पर्यंत वीज पुरवठा खंडीत झालेला असतो.
रस्त्यांची अवस्था दयनीय
येथील मुख्य भिवंडी ते वसई या रस्त्याची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची वाताहात झाली आहे. गावातील रस्त्यांची अवस्था यापेक्षाही बिकट आहे. काही ठिकाणी मातीचे
तर काही ठिकाणी कॉंक्रीटचे रस्ते आहेत. त्यांची अवस्थासुध्दा फारशी चांगली नाही.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे वाजले तीन तेरा
भिवंडी ते वसई सार्वजनिक वाहतुकीसाठी एसटीची सुविधा येथे उपलब्ध आहे. परंतु ही सेवा वेळेत उपलब्ध नसते. त्यामुळे येथील रहिवाशांना रिक्षांवर अवलंबून राहावे लागत आहे. येथून १५ रुपये शेअर रिक्षाला देऊन अंजूर फाटा गाठणे आणि तेथून पुढे भिवंडी, ठाणे, मुंबईला जाण्याचा मार्ग निवडणे, असा रोजचा दिनक्रम येथील रहिवाशांचा सुरु आहे.
मेट्रोही प्रस्तावित
या भागात मेट्रो प्रस्तावित करण्यात आली असली, तरी भविष्यात तिचा विस्तार करावा लागणार आहे. विकास आराखडा समोर आल्यानंतरच मेट्रोचा विस्तार कुठपर्यंत आणि कशा पध्दतीने करता येऊ शकतो याचे नियोजन केले जात आहे.
पाण्याची समस्या गंभीर
नवीन ठाण्यात येत असलेल्या गावांची संख्या ही पाच ते सातच्या घरात आहे. खारबाव येथे नळ पाणी योजना असून येथील घराघरात नळ आहेत. तसेच बोअरवेल, विहीरीही आहेत. त्यामुळे खारबावला पाण्याची समस्या नाही. परंतु, खारबाववगळता पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे आदी गावात मात्र नळ पाणी योजनाच अस्तित्वात नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना एकतर बोअरवेलच्या जड पाण्यावर किंवा विहिरीवरील पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहेत. प्रत्येक गावाच्या वेशीवर एकच विहिर असल्याने दुरवरच्या रहिवाशांना पाण्यासाठी कंबरडे मोडावे लागत आहे.
बुलेट ट्रेन, मल्टीमोडल कॉरिडोरसाठी आधीच गेल्या जमिनी
या गावांमधून बुलेट ट्रेन जाणार आहे. मल्टीमोडल कॉरीडॉरसुध्दा जाणार आहे. त्यामुळे यासाठी आधीच अनेक शेतकºयांच्या जमिनी गेल्या आहेत. काही जमीनी खाडीकिनारी असून, त्याकडे शेतकºयांनी लक्ष न दिल्याने आता त्याठिकाणी कांदळवन वाढले आहे. त्यामुळे त्या जमिनींना हातसुध्दा लावू शकत नाही. त्यात आता मेट्रोसुध्दा येथे प्रस्तावित असून रेल्वेचा मार्गही सुरु आहे. यासाठीसुध्दा येथील शेतकºयांच्या जमिनी जाणार आहेत. त्यात नवीन ठाणे विकसित झाल्यास येथील शेतकरी १०० टक्के भूमिहीन होईल असा दावा रहिवासी करीत आहेत.
आरोग्य सुविधांची वानवा
येथील खारबाव वगळता पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी नागरे या भागात आरोग्याच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. खारबाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. याठिकाणी रोज बाह्यरुग्ण विभागात २ हजारांच्या आसपास रुग्ण उपचारासाठी येत असतात. परंतु याठिकाणी केवळ प्राथमिक उपचारच होत आहेत. आॅपरेशन थिएटर असले, तरी त्याठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यात या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.जमेची बाब म्हणजे या आरोग्य केंद्रात महिलांच्या प्रसुती केल्या जातात. परंतु इतर उपचारासांठी भिवंडी, ठाणे किंवा थेट मुंबईला धाव घ्यावी लागते.
बुलेट ट्रेनमुळे जमिनीला आला भाव
या भागातून बुलेट ट्रेन जात असल्याने येथील जमिनींचा सर्व्हे झालेला आहे. येथील जमिनीला यापूर्वी एक ते दीड लाख गुंठा भाव मिळत होता. बुलेट ट्रेनमुळे तो १० ते ११ लाख एवढा मिळाला आहे. त्यामुळे येथील शिल्लक जमिनीलासुध्दा भाव वाढला आहे. दुसरीकडे हायवेलगत असलेल्या जमिनीला यापूर्वी ४ ते ५ लाख गुंठा भाव मिळत होता. परंतु काही विकासकांनी गाववाल्यांना फसविल्याने या जमिनीचा भाव ३ ते ४ लाख रुपये प्रति गुठ्यांवर आला आहे.
शिक्षणाच्या
संधीही अपुऱ्या
येथील सर्वच गावांत हुशार विद्यार्थी असून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. परंतु शिक्षणाच्या संधी येथे उपलब्ध नाहीत. प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. परंतु पुढील शिक्षणासाठी भिवंडी किंवा ठाणे, मुंबईकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे चांगले विद्यार्थी येथे घडत असले, तरी रोजगारापासून त्यांनी वंचित राहावे लागते.
भात शेतीही संकटात
या भागात पारंपरीक पध्दतीने भात शेती केली जाते. परंतु इतर व्यवसाय बंद पडल्याने भात शेती करण्यासही अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोलाने विकासकांना विकल्या आहेत. त्यामुळे जमिनींचे प्रमाणही कमी झाले आहे. काही जमीनी या बुलेट ट्रेन, मल्टीमोडल कॉरीडोर यासाठी गेल्याने अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. काहींच्या हाती अगदी छोट्या जमिनी राहिल्या आहेत.
रेती व्यवसायही बंद
या गावांना खाडी किनारा लाभला असल्याने वीट भट्टीबरोबरच रेती व्यवसायसुध्दा मोठ्या प्रमाणात सुरु होता. परंतु या व्यवसायालासुध्दा फटका बसला आहे. आजही येथे काही प्रमाणात चोरीछुपके डुबीने रेती काढली जात आहे. परंतु रॉयल्टीचा मुद्दा असल्याने रेती व्यवसाय करणेही अवघड झाले आहे. यापूर्वी यातून शासनाला निधी मिळत होता. आता शासनाचा महसूल बुडत असून, अधिकारी आणि पोलिसांची खिसे मात्र गरम होत आहेत. त्यामुळे हा व्यवसायसुध्दा जवळजवळ बंदच आहे. यावर अवलंबून असणाºया अनेक कुटुंबांवर बेकारीची वेळ आली आहे.
विकास आराखडा तयार करण्यासाठी हालचाली
नवीन शहर तयार करताना त्याचा विकास आराखडा तयार करावा लागतो. हा विकास आराखडा तयार होऊन येथे रस्ते, पाणी, वीज आणि इतर मुलभूत सोयीसुविधा कशा पध्दतीने आणि किती प्रमाणात गरजेच्या आहेत, याचा अंदाज काढला जाणार आहे. त्यानुसार त्याचे नियम ठरविण्यात येऊन पुढील दिशा ठरविली जाणार आहे. त्यानंतर पुढील २० वर्षांत या विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाली केल्या जाणार आहेत.
गायमुख ते खारबाव खाडीपूल ठरणार मुख्य सेतू
गायमुख ते खारबाव हा खाडी पूल तयार झाल्यास नवीन ठाणे अगदी ठाणे शहराच्या जवळ येणार आहे. या पुलाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासंदर्भातील प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी महासभेत मंजूर झाला आहे. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात दळणवळण व्यवस्थेवर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. त्यामुळे हा मुख्य सेतू नव्या ठाण्याच्या विकासासाठी आधार ठरणार आहे. त्यामुळे हा पूल व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनीसुध्दा लावून धरली आहे.
असा होणार विकास
या भागात तब्बल ३ हजार हेक्टरवर नवीन ठाणे वसवण्याचे स्वप्न पाहण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ७५ हजार परवडणारी घरे निर्माण करण्याचा मानस पालिकेचा असणार आहे. त्यानुसार या नव्या शहराची लोकसंख्या ही सुमारे चार लाखांच्या घरात
जाणार आहे. महापालिका येथे परवडणारी घरे उभारणार आहे.
विकासकांचे प्रकल्पही पडले ओस
या गावाचा विकास होईल या अपेक्षेने येथे काही स्थानिकांनीच रेती आणि वीटभट्टीचा व्यवसाय बंद पडल्यावर बांधकाम व्यवसायात आपले नशीब आजमवण्यास सुरवात केली. त्यानुसार हायवेला खारबाव रेल्वे स्टेशनलगत अनेक इमारती उभ्या राहिल्या. परंतु आजघडीला या सर्वच इमारती ओस पडल्या असून, त्यांना ग्राहकच सापडेनासे झाले आहेत. येथे इमारतींमधील घरांना १५०० ते २ हजार रुपये प्रती चौरस फुटाचा भाव मिळत आहे.
पार्क, विरंगुळा केंद्र,
ओपन ग्रीन गार्डन
सर्वात महत्वाची आणखी एक बाब म्हणजे, या भागात रिक्रिएशन एरीयासुध्दा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्याठिकाणी मोठे पार्क, विरंगुळा केंद्रे, ओपन ग्रीन गार्डन अशा विविध संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
वसईतील गावांनाही होणार फायदा
या गावांची वेस वसईमधील गावांना लागून जाणारी आहे. त्यामुळे या नवीन ठाण्यातील महसुली उत्पन्न देणाºया गावांचा विकास होणार असला, तरी त्याचा फायदा रेल्वे लाईनपासून लागून असलेल्या वसईच्या हद्दीतील गावांनासुध्दा आपसूकच होणार आहे.
नवीन ठाण्याच्या पार्श्वभूमीवर येथील स्थानिकांनी उपस्थित केलेले प्रश्न...
लोकल सेवा सुरु
करण्याची मागणी
दिवा - वसई ही शटल सेवा येथे सुरु आहे. या सेवेच्या रोज सात फेºया होतात. परंतु त्या ठराविक वेळेत असल्याने फारसा फायदा होत नाही. येथून शटल पकडल्यावर कोपर किंवा दिव्याला उतरुन पुढे जावे लागते. पनवेलपर्यंत लोकल सेवा सुरु करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. त्यांची ही मागणी मान्य झाली असली, तरी ही सेवा केव्हा सुरु होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एफएसआय किती?
नवीन ठाण्याला आमचा विरोध नाही, किंबहुना विकासाला कोणीही रोखू शकणार नाही. परंतु आमचे काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे मिळू शकणार आहेत का, असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. आता या भागात सध्या १.५ एफएसआय दिला जात आहे. नवीन ठाणे विकसित होत असताना, किती एफएसआय मिळणार, याचे उत्तर येथील रहिवाशांना हवे आहे.
गावठाणांचे काय होणार?
यापूर्वी नवी मुंबईचा विकास झाला असला तरी येथील गावठाणांची अवस्था गंभीर आहे. या गावांमध्ये जाऊन आम्ही गावकऱ्यांनी पाहणीसुध्दा केलेली आहे. त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. रोजगाराच्या संधी दिलेल्या नाहीत आणि दिलेली आश्वासनेसुध्दा पाळली गेलेली नाहीत. त्यात सध्या ठाण्यात क्लस्टरच्या निमित्ताने गावठाणांचा प्रश्न उभा राहिला आहे. येथेही हाच प्रश्न उपस्थित झाला असून नवीन ठाणे विकसित करताना गावठाण वगळावे अशी मागणी येथील रहिवाशांनी लावून धरली आहे.
मोबदला किती मिळणार, रोजगाराचे काय?
सध्या मंदीच्या सावटामुळे येथील जमिनीला भाव नाही. आधीच विविध विकास कामांसाठी येथील शेतकºयांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यात नवीन ठाणे विकसित झाल्यास येथील शेतकरी भूमिहीन होणार आहे. त्यामुळे त्याला रोजगारसुध्दा उपलब्ध असणार नाही. त्यामुळे जमीनीचा योग्य मोबदला मिळणार आहे का, असा सवाल येथील रहिवाशांना भेडसावत आहे. मोबदला मिळताना घरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
जमिनी गेल्यास प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले मिळावेत
यापूर्वीसुध्दा येथील अनेक जमिनी विकास कामांमध्ये गेलेल्या आहेत. आतासुध्दा अनेक जमिनी नवीन ठाण्याच्या विकासात जाणार आहेत. त्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार असल्याने शेतकºयांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले दिले जावेत.
नवीन ठाण्याला आमचा प्रखर विरोध आहे, नवीन ठाण्याचा विकास करताना, येथील शेतकरी भूमीहीन होणार आहे. त्यामुळे येथील शेतकºयांचा विचार होणे गरजेचे आहे.
- विशाल पाटील,
उपसरंपच - मालोडी
आधीच या गावांमध्ये अनेक समस्या आहेत. अनेकांच्या जमिनी गेल्या आहेत. गावांमध्ये मदींची स्थिती आहे. त्यामुळे नवीन ठाण्याला आम्ही कसे आपलेसे करणार?
- विशाल मढवी,
स्थानिक नागरीक
वीटभट्टी, रेती व्यवसाय बंद पडल्याने आम्हाला हॉटेल, ढाबे सुरु करावे लागले आहेत. परंतु त्यातही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे नवीन ठाणे झाल्यास विकासाच्या संधी आम्हाला उपलब्ध होणार आहेत का?
- निलेश चौधरी, हॉटेल व्यावसायिक