गाळात रुतलेली पालिका वर काढण्याचे काँग्रेसपुढे आव्हान
By admin | Published: May 29, 2017 06:12 AM2017-05-29T06:12:39+5:302017-05-29T06:12:39+5:30
गेल्या ३० वर्षांत प्रथमच भिवंडीतील जनतेने एका पक्षाच्या बाजूने कौल दिला असल्याने आता आर्थिक डबघाईला आलेल्या या महापालिकेचा
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: गेल्या ३० वर्षांत प्रथमच भिवंडीतील जनतेने एका पक्षाच्या बाजूने कौल दिला असल्याने आता आर्थिक डबघाईला आलेल्या या महापालिकेचा गाडा स्वबळावर हाकण्याची कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे. केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने काँग्रेसकडील या महापालिकेला राजश्रय लाभणे कठीण आहे. अशा परिस्थितीत भिवंडीकरांच्या अपेक्षांना सार्थ ठरण्याची काँग्रेसची कसोटी आहे.
मागील निवडणुकीत काँग्रेसचे जास्त नगरसेवक निवडून आलेले असतानादेखील कोणार्क आघाडी व शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने सत्ता स्थापन केली. महापालिकेच्या तिजोरीत अक्षरश: खडखडाट आहे. कराची प्रचंड थकबाकी आहे. महापालिका ८०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली आहे. शहरातील रस्ते, पाणी, नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. मालमत्ताकर हा पालिकेचा एकमेव प्रमुख उत्पन्नस्रोत आहे. मनपातील अधिकारी व कर्मचारी यांनी ही वसुली न केल्याने शासनाकडून मिळणारे अनुदान व निधीवर अवलंबून राहावे लागत आहे.अशा स्थितीत महानगरपालिकेस आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.
शहरात भाजपाचे खासदार, शिवसेना व भाजपाचे असे दोन आमदार असून भाजपाची सत्ता असल्यामुळे अपेक्षित अनुदान, निधी मिळताना कोंडी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महापालिकेत भाजपाची सत्ता आली, तर भरपूर निधी उपलब्ध करून देऊ. मात्र, तिजोरीच्या चाव्या चोरांच्या हाती दिल्या, तर निधीची लूट करणाऱ्यांच्या खिशात तो जाऊ देणार नाही, असे स्पष्ट विधान फडणवीस यांनी जाहीर सभेत केले होते. त्यामुळे काँग्रेसने स्वबळावर महापौर बसवला व शहराचा विकास झाला नाही, तर येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते.
देशात भाजपाला अनुकूल वातावरण असताना भिवंडीतील बहुसंख्य मुस्लिम समाजाने काँग्रेसची साथ देऊन नवे संकेत दिले आहेत.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याकडे आकृष्ट झालेला मुस्लिम गोमांसबंदी व ट्रिपल तलाक अशा मुद्द्यांमुळे तसेच भाजपा-रा.स्व. संघाच्या बेलगाम नेत्यांच्या वक्तव्यांनी पुन्हा काँग्रेसकडे वळला आहे, असे दिसत आहे.
त्यामुळे पुन्हा धार्मिक राजकारणाची पोळी न पिकवता मुस्लिम समाजाचा विकास करून दाखवण्याचे व हाच भिवंडी पॅटर्न पुढील निवडणुकीत काँग्रेसला यश देईल, अशी बांधणी करावी लागेल, असे मुस्लिम समाजातील नेत्यांचेही मत आहे.