चाणक्यांचे राज्यशास्त्रीय नियम आजही पडतात लागू; प्राची दामले यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:36 PM2019-09-24T22:36:45+5:302019-09-24T22:36:57+5:30
‘आजच्या संदर्भात, कौटिलीय, अर्थशास्त्रातील राज्यव्यवस्था’ विषयावर मार्गदर्शन
डोंबिवली : अर्थशास्त्र हे केवळ पैशांसंदर्भातील शास्त्र नसून, ते खरेतर समग्र राज्यशास्त्रच आहे. आर्य चाणक्य यांनी इसवीसनापूर्वी लिहिलेले अर्थशास्त्र आणि चाणक्याचे राज्यशास्त्रीय नियम आजच्या काळासंदर्भात लागू पडतात, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ डॉ. प्राची दामले यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेतर्फे ‘आजच्या संदर्भात, कौटिलीय, अर्थशास्त्रातील राज्यव्यवस्था’ या विषयावर दामले यांचे व्याख्यान नुकतेच झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पूर्वेतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या विनायक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेच्या कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे, कार्यवाह डॉ. धनश्री साने उपस्थित होत्या.
दामले म्हणाल्या, ‘उन्मत्त धनाढ्यांचा पाडाव करून चंद्रगुप्त यांना गादीवर बसले. हे करताना चाणक्य यांनी जनतेतील असंतोषाचा उपयोग करून सत्तांतर घडविताना चंद्रगुप्त यांच्या रूपाने सशक्त पर्याय दिला. चंद्रगुप्त यांना अंतर्गत विरोध होणार, त्यांच्या हत्येचे प्रयत्न होणार हे गृहीत धरून चाणक्य यांनी अतिशय चाणाक्षपणे व्यूहरचना केली. चाणक्यांच्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त यांनी आपले साम्राज्य बंगालच्या उपसागरापासून ते दक्षिणेपर्यंत विस्तारले. एवढेच नव्हे तर सम्राट अलेक्झांडरशी यशस्वी झुंज दिली. त्यावेळेच्या भारतीय समाजाचे वर्णन मॅगेस्थेनिस, फान किंवा ह्यूएनसंग या प्रवाशाने लिहून ठेवले आहे की, इथले लोक अतिशय नैतिक वर्तन करतात. घराला कुलुपे नसतात आणि सुसंपन्न, असा हा समाज आहे, असे त्यात लिहिले आहे.’
‘रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या किंवा मलमूत्र विसर्जन करणाºयाला दंड करावा. जकात किती वसूल करावी. ऐपत असताना कर दिला नाही किंवा बुडवला तर दंड तसेच सुवर्ण व्यावसायिक आणि वैद्यक व्यावसायिक लोकांची फसवणूक करू शकतात म्हणून त्यांच्यासाठी नियमावली, राजाला जागे ठेवण्याचे काम मंत्र्यांनी करायला हवे, अशी अनेक सूत्रे चाणक्य यांनी सांगितली आहेत. ही सूत्रे आजच्या काळातही लागू पडतात,’ असे त्यांनी सांगितले. चाणक्यांच्या सात सूत्रांना सप्तांग राज्यव्यवस्थेच्या सर्वच अंगाचा परिचय दामले यांनी करून दिला.
यावेळी श्रीकांत पावगी, डॉ, ललिता नामजोशी, डॉ. सदाशिव देव, प्रकाश पाटील, सुभाष मुंदडा, वसंत चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वी मसापचे डोंबिवली शाखेचे अध्यक्ष आणि साहित्यिक वामनराव देशपांडे यांचा ७५ व्या वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. दरमयान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश देशंपाडे तर, सूत्रसंचालन वृंदा कौजलगीकर यांनी केले.
प्रजेचा आनंद हाच राजाचा आनंद
राजाच्या कर्तव्याची जाणीव करून देताना प्रजेचा आनंद हाच राजाचा आनंद असायला हवा, नव्हे ते तर व्रत असायला हवे तसेच राजाचा दिवसभराचे नियोजन कसे असावे, हेरखाते त्यांचे कामकाज,अर्थव्यवस्था, संरक्षणव्यवस्था, प्रजेच्या भेटीगाठी हे सांगून राजा हा पगारी नोकरासारखा असतो. त्यांच्या मनोरंजनाच्या वेळाही चाणक्य यांनी ठरवून दिल्या होत्या, असे दामले म्हणाल्या.