नवरात्रोत्सवानिमित्त घाेडबंदर रोडवरील वाहतूक मार्गात बदल, वाहतूकीची अधिसूचना
By जितेंद्र कालेकर | Published: October 10, 2023 11:52 PM2023-10-10T23:52:35+5:302023-10-10T23:52:57+5:30
पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: नवरात्रोत्सव तसेच दसरा सणानिमित्त वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने कासारवडवली परिसरातील वाहतूक मार्गात बदल केल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली. २४ ऑक्टाेंबर रोजी दुपारी २ ते देवीच्या मूर्तींचे विसर्जन होईपर्यंत ही अधिसूचना अंमलात राहणार असल्याचेही वाहतूक शाखेने आदेशामध्ये म्हटले आहे.
उपायुक्त राठोड यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, कासारवडवली परिसरात नवरात्रोत्सव आणि दसरा सणानिमित्त २४ ऑक्टाेंबर रोजी मोठया प्रमाणात सार्वजनिक तसेच खासगी नवरात्र देवी मूर्ती, घट आणि फोटो प्रतिमा यांचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे विसर्जन घाटाच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी या भागात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या मार्गात बदल केला आहे. गुजरात महामार्गाने ठाण्याच्या घाेडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठया वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद केला आहे. तसेच मुंबई, वसई, विरारकडून घाेडबंदर रोडच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठया वाहनांना फाऊंटन हॉटेलजवळ प्रवेश बंद राहणार आहे. त्याचबरोबर घाेडबंदर रोडने ठाण्याकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या मोठया वाहनांना गायमुख जकात नाका याठिकाणी प्रवेश बंद केला आहे.
त्याऐवजी - गुजरात, मुंबई, विरारकडून घाेडबंदर रोडच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची मोठी वाहने चिंचोटी नाका येथून कामण- अंजूर फाटा- माणकोली भिवंडी मार्गे पुढे सोडण्यात येणार आहेत. ही अधिसूचना पोलिसांची वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि गणेश विसर्जनातील वाहनांसह अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचेही या आदेशात म्हटले आहे.