कल्याण शहर जिल्हा काँग्रेसमध्ये बदलाचे वारे, निवडणूक लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:32 AM2017-10-03T00:32:01+5:302017-10-03T00:32:17+5:30
कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. आॅक्टोबरमध्ये जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होणार असून यंदा तरी डोंबिवलीकडे जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व द्यावे
प्रशांत माने
कल्याण : कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे. आॅक्टोबरमध्ये जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होणार असून यंदा तरी डोंबिवलीकडे जिल्हा काँग्रेसचे नेतृत्व द्यावे, अशी मागणी तेथील कार्यकर्त्यांकडून होत आहे.
कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस पक्षाला पुरती उतरती कळा लागली आहे. २००५ च्या निवडणुकीत पक्षाचे २१ नगरसेवक केडीएमसीवर निवडून गेले होते. हाच आकडा २०१० च्या निवडणुकीत १५ वर आला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत तर पक्षाचे केवळ चार नगरसेवकच निवडून आले. या उतरत्या कळेला पक्षातील गटबाजी आणि पक्ष वाढवण्याऐवजी एकमेकांची प्रदेशपातळीवर काढली जाणारी उणीदुणी कारणीभूत असल्याचे बोलले जाते. विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये नव्या जिल्हाध्यक्षाची निवड होणार आहे. दुसºया किंवा तिसºया आठवड्यात ही निवड होणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्हाध्यक्षपदावरून कल्याण-डोंबिवलीत रस्सीखेच सुरू झाली आहे. कल्याणमध्ये आमदार संजय दत्त आणि प्रकाश मुथा यांचे गट सध्या सक्रिय असले तरी डोंबिवलीत जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक जण रिंगणात आहेत.
डोंबिवलीतील आॅगस्टमध्ये झालेल्या बैठकीत नकुल पाटील व सुदाम भोईर यांच्यानंतर शहराला जिल्हाध्यक्ष मिळालेला नसल्याने यंदाचा जिल्हाध्यक्ष डोंबिवलीतून निवडावा, अशी आग्रही मागणी पदाधिकाºयांनी केली. डोंबिवलीतील संतोष केणे, गंगाराम शेलार, नंदू म्हात्रे व अमित म्हात्रे हे जिल्हाध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. सध्या त्यांनी मौन बाळगले असले तरी सर्वानुमते जिल्हाध्यक्ष निवडला जावा, निवडणूक होऊ नये, अशी भूमिकाही निरीक्षकांच्या बैठकीत घेतली गेली. परंतु, मुथा आणि दत्त यांच्यापुढे डोंबिवलीकरांची डाळ शिजणार का, याबाबतही साशंकता आहे.