शेअर बाजाराकडे बघण्याची दृष्टी बदला - चंद्रशेखर टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 02:40 AM2018-08-15T02:40:56+5:302018-08-15T02:41:33+5:30
शेअर बाजार सतत बदलणारे क्षेत्र आहे. सध्या जे बाजारात सुरू आहे त्याचे स्वरूप, त्याचे प्रमाण आणि त्याची कारणमीमांसा ही आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
डोंबिवली - शेअर बाजार सतत बदलणारे क्षेत्र आहे. सध्या जे बाजारात सुरू आहे त्याचे स्वरूप, त्याचे प्रमाण आणि त्याची कारणमीमांसा ही आधीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे शेअर बाजाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आणि त्यात सहभागी होताना आपण अवलंबण्याची कार्यपद्धती बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.
फे्रण्ड्स कट्टा आणि पै फ्रेण्ड्स लायब्ररी यांनी ‘बदलत्या बाजारात आम्ही’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी टिळक बोलत होते. शास्त्री सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. टिळक म्हणाले, मोदी आणि आधीची सरकारे यांच्या अर्थनीतीमुळे आपल्या शेअर बाजाराचे निर्देशांक विक्रमी पातळीवर आहेत. आधीच्या अनेक दशकांच्या तुलनेत हे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. हा बदल सर्वांनीच आवर्जून लक्षात घेतला पाहिजे.
बदलत्या शेअर बाजाराचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे निर्देशांक विक्रमी पातळीवर असताना अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती त्यांच्या वर्षभरातील सगळ्यात खालच्या पातळीवर आहेत. हा मुद्दा स्पष्ट करताना टिळकांनी अनेक कंपन्यांच्या नुकत्याच जाहीर झालेल्या वार्षिक कामगिरीचे मार्मिक विश्लेषण केले. भांडवलवृद्धी आणि तरलता यांचे बदलते कोष्टक हे बदलत्या बाजाराचे अजून एक वैशिष्ट्य आहे.
बाजारातील तेजीचे श्रेय विदेशी वित्तसंस्थांच्या खरेदीला देण्याचा प्रघात होता. त्याच न्यायाने मंदीचे खापर अशा वित्तसंस्थांनी केलेल्या विक्रीवर फोडले गेले आहे. काही महिन्यांत विदेशी वित्तसंस्थांनी ६००० कोटी रुपयांहून जास्त किमतीचे शेअर्स विकले आहेत.
उभरत्या बाजारातून बाहेर पडण्याचा न्याय, अशा संस्था आपल्या देशालाही लावत आहेत. तरीही शेअर बाजाराचा निर्देशांक विक्रमी पातळीवर आहे, हे बाजाराचे वैशिष्ट्य आहे. मोदी सरकारच्या यशस्वी विदेशी नीतीचा घोष करताना या गोष्टीचा विसर पडणे परवडणारे नाही, याकडे टिळक यांनी लक्ष वेधले.
अनेक देशांतर्गत आणि जागतिक घटना, तेलाच्या किमती, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी अवलंबलेले धोरण, मोदी सरकारच्या धोरणाचे झालेले आणि संभाव्य फलित आणि त्यांचे दूरगामी परिणाम यांची त्यांनी सोदाहरण चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आतिश कुलकर्णी यांनी केले.