वाहतूक नियंत्रणासाठी ‘नमो सेंट्रल पार्क’ परिसरात वाहतूक मार्गात बदल, कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
By जितेंद्र कालेकर | Published: March 1, 2024 11:51 PM2024-03-01T23:51:29+5:302024-03-01T23:51:48+5:30
शनिवार, रविवारी लागू राहणार बदल
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येथील कोलशेत भागात उभारलेल्या ‘नमो सेंट्रल पार्क’मध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्यांवर वाहनांची मोठी कोंडी होत आहे. हीच कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता शनिवार आणि रविवारी येथील वाहतूक मार्गात प्रयोगिक तत्वावर मोठे बदल केले आहेत. ही वाहतूक शहराबाहेरून बाळकूम येथून भिवंडीकडे जाणार्या मार्गावरील पर्यायी मार्गावरून वळविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
ठाण्यातील नागरिकांना हक्काचे पार्क मिळावे यासाठी पालिकेने कोलशेत भागात नमो सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित केले आहे. या सेंट्रल पार्कमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.त्यामुळ्रे या परिसरात दोन हजार ते अडीच हजार इतकी वाहने उभी राहून मोठी कोंडी होत आहे. पार्कसिटी याठिकाणी येणाºया वाहनांसाठी केवळ २०० ते २५० इतक्याच वाहनांच्या पार्र्किंगची सुविधा आहे.
पर्यटकांच्या वाहनांचा भार वाढल्याने कोलशेत, ढोकाली आणि हायलँड भागात वाहतुक कोंडी होत आहे. या कोंडीबाबत नागरिकांकडून नाराजीचा सूर उमटू लागताच वाहतूक पोलिसांनी या भागातील कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पाऊले उचलली आहेत. वाहतूक शाखेने दिलेल्या माहितीनुसार कापुरबावडी सर्कल येथून येणारी वाहने बाळकुम नाका सिग्नल येथून दादलानी पार्ककडे जाणाऱ्या चौकातून भिवंडीकडे जाणाऱ्या वाहिनीच्या दिशेने जातील. याच मार्गे कळवा- साकेत येथून येणारी वाहने पार्कच्या दिशेने जातील. काल्हेर-कशेळी-भिवंडी मार्गे येणारी वाहने दादलानी पार्क चौकातून वळण घेऊन ठाणे-भिवंडी वाहिनीवरून पुढे दोस्ती वेस्ट कॉन्ट्री प्रवेशद्वारातून पार्कच्या दिशेने जातील. एका महिन्याच्या प्रायोगिक तत्वावर हे बदल लागू केले असून पार्कमध्ये जाणाऱ्या नागरिकांनी या मागार्चा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. राठोड यांनी केले आहे.
कल्पतरू गृहसंकुलामध्ये रहिवाशी राहण्यासाठी आल्यानंतर वाहनांची संख्या २२०० इतकी होणार आहे. तसेच ब्रॉडवे आॅटोमोबाईल्स पेट्रोल पंप ते विहंग इन हॉटेल या सेवा रस्त्यावर मलवाहिनी टाकण्यात येणार असून त्याचबरोबर मलजोडणीची कामे करण्यात येणार आहे. यासाठी खोदकाम करण्यात येणार असल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. या सर्वच पार्श्वभूमीवर येथील मार्गात वाहतूक बदल लागू केले आहेत.