जाहिरात कंपनीसाठी महापौर म्हस्केंकडून मूळ ठरावात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:15 AM2021-02-18T05:15:10+5:302021-02-18T05:15:10+5:30
ठाणे : शहरातील मोक्याच्या जागा जाहिरात कंपन्यांना आंदण दिल्या जात असतानाच २३ डिसेंबर रोजी झालेल्या महासभेत एका जाहिरात कंपनीच्या ...
ठाणे : शहरातील मोक्याच्या जागा जाहिरात कंपन्यांना आंदण दिल्या जात असतानाच २३ डिसेंबर रोजी झालेल्या महासभेत एका जाहिरात कंपनीच्या भल्यासाठी मूळ ठरावात महापौर नरेश म्हस्के यांनी परस्पर बदल केल्याचा आरोप भाजपचे गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी बुधवारी केला. तीर्था ॲडव्हर्टायझिंगला सात जागांसाठी हक्क देण्याचा ठराव असताना तीर्थाबरोबरच सुवर्णा फायब्रेटिकला दोन महत्त्वाच्या जागा दिल्याचे ते म्हणाले.
२३ डिसेंबर रोजी झालेल्या खंडित महासभेत ठराव क्र. २३९ हा मांडला होता. त्यात मे. तीर्था ॲडव्हर्टायझिंगला १८ ठिकाणी शौचालये बांधण्याच्या बदल्यात पोखरण रोड नं. २, भास्कर कॉलनी सर्व्हिस रोड गुरुद्वाराजवळ, कोपरी ब्रिज सर्व्हिस रोड, नितीन कंपनी सिग्नल येथील सर्व्हिस रोड, मानपाडा ते विहंग हॉटेलदरम्यान, ब्रह्मांड सिग्नलजवळ, देव कॉर्पोरा बिल्डिंग ते गणेशवाडी येथील सर्व्हिस रोड येथील सात ठिकाणी शौचालयांसाठी जागा देण्याची शिफारस केली होती.
या संदर्भात मे. तीर्था ॲडव्हर्टायझिंग यांना महासभा ठराव क्र. २२४८, २८/०२/२०१८ व महासभा ठराव क्र. ६२८, २६/१२/२०१८ अन्वये निश्चित करून दिलेल्या जागांमध्ये बदल होत असल्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालये उभारून त्यावर स्वारस्य अभिव्यक्ती निविदेप्रमाणे मंजूर असलेल्या जाहिरात फलकास परवानगी देण्याचा ठराव २० डिसेंबर रोजीच्या महासभेत मांडला. मात्र, ही महासभा खंडित झाल्याने २३ डिसेंबर रोजी कामकाज झाले. त्यात हा ठराव मंजूर झाला होता, असे वाघुले यांनी सांगितले.
या ठरावात कोपरी ब्रिज सर्व्हिस रोडचा प्रस्ताव वगळून भांजेवाडी, चिखलवाडी येथे शौचालय बांधून तीर्था कंपनीला जाहिराती झळकविण्यास मंजुरी दिली, तर याच कंपनीला बाळकुम जकात नाका येथील सर्व्हिस रस्त्यावर शौचालय उभारण्यास परवानगी नाकारली गेली, असे त्यांनी सांगितले.
मात्र, महापालिकेच्या सचिव विभागाने प्रसिद्ध केलेल्या इतिवृत्तात महापौर म्हस्के यांच्या स्वाक्षरीने भलताच ठराव मंजूर झाल्याचे उघड झाले आहे. मूळ ठराव मे. तीर्था ॲडव्हर्टायझिंगचा असताना सुवर्णा फायब्रेटिक कंपनीला दोन जागा बदलून दिल्या. यापूर्वी या कंपनीला शौचालयांसाठी दिलेल्या नितीन कंपनी सर्व्हिस रोड व माजिवडा गाव-रुस्तमजी लोढा प्रकल्प येथील जागांऐवजी कोपरी येथील दत्ताजी साळवी निसर्ग उद्यानासमोरील बाजूला व ज्युपिटर हॉस्पिटलनजीकच्या हरदासनगर, वसंत लॉन्सजवळच्या मोक्याच्या जागा बहाल केल्या. प्रत्यक्षात याबाबत महासभेत चर्चा झाली नव्हती. मात्र, या ठरावावर महापौर यांची स्वाक्षरी आहे, याकडे वाघुले यांनी लक्ष वेधले.
......
जोड - ती कंपनी भाजपच्या माजी मंत्र्याच्या पतीची