केडीएमटीच्या मार्गात लवकरच बदल, आयुक्तांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:22 AM2019-05-11T00:22:20+5:302019-05-11T00:23:00+5:30
शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी केडीएमटी उपक्रमाच्या बसच्या मार्गात लवकरच बदल केले जाणार आहेत.
डोंबिवली - शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी केडीएमटी उपक्रमाच्या बसच्या मार्गात लवकरच बदल केले जाणार आहेत.
केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी महापालिका मुख्यालयात शुक्रवारी आपत्कालीन व्यवस्था आणि वाहतूककोंडीबाबत विशेष बैठक घेतली. याप्रसंगी महापालिकेतील अधिकारी, वाहतूक शाखा आणि आरटीओचे अधिकारीही उपस्थित होते. यावेळी काही बदल सूचवण्यात आले.
केडीएमटीच्या डोंबिवलीत १७ बस चालतात. त्यापैकी आठ ते दहा बसच्या मार्गात बदल केले जाणार आहेत. त्यात निवासी विभाग, दावडी आणि ग्रामीण भागातील बस मार्ग आहेत. सध्या डोंबिवली स्थानक परिसरात येणाऱ्या बस बाजीप्रभू चौकातील स्टॅण्ड, इंदिरा गांधी चौक येथे उभ्या केल्या जातात. या बस सुटण्याची वेळ होत नाही, तोपर्यंत त्या तिथेच उभ्या केल्या जातात. शिवाय त्याचठिकाणी भाजी मार्केट, रिक्षास्टॅण्डही आहे. हा परिसर वर्दळीचा असल्याने सकाळ-सायंकाळी येथे नेहमी वाहतूककोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी बोडके यांनी बैठकीत काही बदल सूचविले असून, लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बाजीप्रभू आणि इंदिरा गांधी चौकात यापुढे बस केवळ प्रवासी घेण्यासाठीच थांबतील. या बस विश्रांतीसाठी नेहरू रोडवर थांबतील. निवासी, दावडी आणि ग्रामीण भागातून येणाºया बस टिळक रोडने येऊन नेहरू रोडकडे जाऊन तेथेच थांबतील. त्यांची निर्गमनाची वेळ झाल्यास त्या तेथून निघून चिमणी गल्लीतून पुन्हा बाजीप्रभू आणि इंदिरा गांधी चौकातील थांब्यांवर केवळ प्रवासी घेतील आणि पुढे मार्गस्थ होतील. त्यामुळे बस मार्गाला अडथळा ठरणारे नेहरू रोड आणि चिमणी गल्लीतील फेरीवाले तसेच रिक्षास्टॅण्ड हलविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी प्रभाग अधिकारी आणि वाहतूक शाखेला दिल्या आहेत.
अंमलबजावणी होईल?
मध्यंतरी पूर्वेला रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या डॉ. राथ रोडवरून केडीएमटी बस चालवली जात होती. फेरीवाला अतिक्रमणावर मात करण्यासाठी हा उपाय शोधून काढण्यात आला होता. परंतु, कालांतराने येथील केडीएमटीच्या फेºया बंद करण्यात आल्या. त्यामुळे आयुक्तांनी सूचवलेल्या बदलांवर प्रभावीपणे अंमलबजावणी होईल का?, याबाबत मात्र साशंकता व्यक्त होत आहे.