अभ्यासक्रमबदलाने निकालाचा टक्का घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 01:24 AM2019-06-09T01:24:31+5:302019-06-09T01:24:58+5:30
शिक्षकांचे मत । संस्कृत, हिंदीमुळे विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
जान्हवी मोर्येे
डोंबिवली : इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळेचा निकाल १० ते १५ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना हिंदी आणि संस्कृत या दोन विषयांमध्ये चांगले गुण मिळाल्याने त्यांची टक्केवारी वाढण्यास मदत झाल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.
निकालाविषयी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित म्हणाले, निकालाची टक्केवारी घसरणार हे अनपेक्षित होते. यंदाच्या वर्षी अभ्यासक्रम बदलला असल्याने विद्यार्थी आणि पेपर तपासनीस यांच्यासाठी हे सर्व नवीन होते. त्यामुळे आतापर्यंतच्या अनुभवावरून अशावेळी निकाल हा चांगला लागतो. हिंदी आणि संस्कृतमध्ये किंवा केवळ हिंदी, संस्कृत या विषयांत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत. त्यामुळे या विषयांमुळे टक्केवारी वाढली आहे. शाळेतील संस्कृत विषय घेतलेल्या १४ मुलांना ९९ गुण मिळाले आहेत. गुणांची खैरात यावर्षी बंद झाली आहे. मुलांनी खूप सहजरीत्या ही परीक्षा घेतली असणार. खरंतर, पेपर खूप सोपे होते. त्यामुळे निकाल घसरण्याचे काही एक कारण नव्हते, असे मला वाटते.
टिळकनगर विद्यामंदिरच्या माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका लीना मॅथ्यू म्हणाल्या, यंदाच्या वर्षी पॅटर्न पूर्णत: बदलल्याने हा निकाल घसरला आहे. वर्णनात्मक प्रश्नोत्तरे जास्त होती आणि लघुउत्तरांचे प्रश्न कमी केल्याने निकालावर परिणाम झाला. इंग्रजी विषयात एक उतारा दिला जातो. मात्र, त्यातही बदल केले आहेत. सरकारचे धोरण दरवर्षी बदलते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना कठीण जाते. दहावी हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्या टप्प्यावर पॅटर्न न बदलता आठवीपासून बदलण्याची गरज आहे. त्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रूळण्याची संधी मिळेल. आता सरकारने पुन्हा अभ्यासक्रम बदलू नये. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम माहीत झाला आहे. उत्तरे कशी लिहायची ते समजले आहे.
सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना यंदा कृतिपत्रकांना सामोरे जावे लागले. अंतर्गत गुणही बंद झाल्याने या निकालामुळे खरी गुणवत्ता समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी मेहनत करून मिळवलेले हे गुण आहेत. शाळांना निकालाचा टक्का वाढवण्यासाठी आता अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. अभ्यासक्रम बदलल्याचा फटका बसल्याचे एकूणच सर्वांनी मान्य केले.