‘गण गण गणात बोते’चा मंत्रघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:46 AM2020-02-16T01:46:21+5:302020-02-16T01:51:45+5:30
संडे अँकर । गजानन महाराज प्रकट दिन, कल्याण-डोंबिवलीमध्ये विविध कार्यक्रम
डोंबिवली : श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरामध्ये शनिवारी सर्वत्र विविध धार्मिक कार्यक्रम झाले. ‘गण गण गणात बोते’ या भक्तिमंत्राने अवघे वातावरणच भारून गेले होते. विविध ठिकाणी झालेल्या सोहळ्यांमध्ये भाविकांनी सहभागी होऊ न गजानन महाराजांचे दर्शन घेतले. कल्याणमध्ये बेतूरकरपाडा आणि पारनाका येथील गजानन महाराजांच्या मंदिरातही भाविकांनी मोठी गर्दी झाली होती.
श्री गजानन महाराज सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पूर्वेकडील उपासना केंद्र आणि सर्वेश सभागृहामध्ये श्री गजानन महाराज पादुकांवर लघुरुद्राभिषेक, स्तोत्रांचे पठण, ह.भ.प. मंजूषा भाभे यांचे कीर्तन, आरती, विष्णुसहस्रनामपठण, नादब्रह्म भक्तिगीत मंडळाचे भजन, पारायण, अभिषेक असे पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पडले. उपासना केंद्रात दुपारच्या आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. साडेचार हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तर दिवसभरात १० हजार नागरिकांनी श्रींचे दर्शन घेतले. शुक्रवारी सायंकाळी श्रींचा मुखवटा आणि पादुकांची पालखी काढण्यात आली. पूर्वेतील स्वयंवर सभागृह, शास्त्री सभागृह येथेही उत्सव करण्यात आला. पश्चिमेतील मानव उत्कर्ष समाजसेवा मंडळातर्फे महात्मा फुले रोडवरील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात गीतापठाण, रु द्रपठण, गणपती अथर्वशीर्षपठण, गजानन प्रार्थना स्तोत्र, गजानन विजयग्रंथांचे पारायण, श्रीसूक्तपठण आदी विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी झाले.
काकडआरती, पालखी सोहळा
डोंबिवली पश्चिम, जुनी डोंबिवली गाव येथील गजानन छाया बंगला येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा पार पडला. पारंपरिक पद्धतीने श्रींची महापूजा, अभिषेक आणि पालखी सोहळ्यानंतर सोनारपाडा येथील ह.भ.प. गणेशबुवा यांचे कीर्तन झाले. पश्चिमकडील श्री गजानन महाराज कृपा सेवा संस्था, गरिबाचावाडा येथील राजीव गांधी उद्यानाशेजारी असणाऱ्या गजानन महाराज मंदिरात पहाटे काकडआरती, अभिषेक आणि महापूजेनंतर पालखी सोहळा झाला.