कळव्यात राष्ट्रवादीकडून राम नामाचा जयघोष; आव्हाडांना त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिले आव्हान
By अजित मांडके | Published: January 18, 2024 04:05 PM2024-01-18T16:05:59+5:302024-01-18T16:08:19+5:30
...त्यामुळे एक प्रकार त्यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी आव्हाडांनाच आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.
ठाणे : रामाच्या मुद्यावरुन सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर चांगलीच टिका होत आहे. परंतु दुसरीकडे त्यांच्याच मतदार संघात त्यांच्या पक्षातील काही माजी नगरसेवकांनी राम नामाचा जयघोष करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पट्यात एका माजी नगरसेवकाने थेट ८ हजार झेंड्यांचे वाटप केले आहे. तर काहींनी राम मंदिर दिनाच्या निमित्ताने महाआरतीचे आयोजनही केले आहे. त्यामुळे एक प्रकार त्यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी आव्हाडांनाच आव्हान दिल्याची चर्चा सुरु झाली आहे.
संपूर्ण देशभर सध्या राम नामाचा जयघोष केला जात आहे. ठाण्यातही शिवसेना आणि भाजपकडून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कुठे महाआरती, कुठे प्रवचन, पाठ पुजा आदींसह इतर कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली आहे. तर घराघरात राम मंदिराचे निमंत्रण देखील पोहचविले जात आहे. परंतु दुसरीकडे राम हे मासाहारी होते, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्याने एकच वादंग निर्माण झाला आहे. मागील काही दिवसापासून राज्यात यावरुन अनेक आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षातील इतर नेते देखील काहीसे अडचणीत आल्याचे चित्र आहे.
ठाण्याच्या विविध भागात राम मंदिराच्या निमित्ताने कुठे झेंडे तर कुठे निमंत्रण तर कुठे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच कळवा भाग मागील काही दिवस काहीसा अल्पीत होता. परंतु आता येथील इमारतीच्या प्रत्येक घरावर चाळीतील घरांवर प्रभु श्री रामाचे झेंड झळकू लागले आहेत. परंतु हे झेंडे भाजप किंवा शिवसेनेकडून दिले गेले नसून जितेंद्र आव्हाड यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी येथील रहिवाशांना देऊ केले आहेत. एका पदाधिकाºयाने तर आपल्या कार्यालयातच झेंडे उपलब्ध करुन दिले असून ज्यांना हवे असतील त्यांनी ते मोफत घेऊन जावेत असे आवाहन केले आहे. दुसरीकडे आणखी एका माजी नगरसेवकाने या निमित्ताने महाआरतीचे आयोजन केले आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मिडियावर प्रसारीत केला आहे.
भाजपला संधीच दिली नाही
एकीकडे शहरभर भाजप आणि शिवसेनेकडून झेंडे वाटप आणि इतर कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपचा मोर्चा कळवा भागात होता. परंतु राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाºयांनी त्यांना ही संधीच दिली नसल्याचीही चर्चा आता होत आहे.
राष्ट्रवादीकडून अशा प्रकारे झेंडे वाटप करण्यात आल्याने काहींना आर्श्चय वाटले असेल. परंतु प्रभु श्री राम हे जसे प्रत्येकाच्या मनात आहेत, तसेच ते या दिवसाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरात दिसावे या उद्देशाने झेंडे वाटप करण्यात आले आहेत. तसेच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
मंदार केणी - माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, ठाणे शहर