विधानसभेतही घोळ कायम; सोसायटीत मतदान केंद्र तरीही मतदारांची नावे दुसऱ्याच ठिकाणी
By अजित मांडके | Published: November 20, 2024 10:37 AM2024-11-20T10:37:25+5:302024-11-20T10:38:59+5:30
सोसायटीमध्ये मतदान केंद्र असताना तेथील रहिवाशांना सुमारे ३ किमी लांब जावे लागत होते.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदारांची नावे घरापासून इतर ठिकाणी गेली होती. तसाच घोळ विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. सोसायटीमध्ये मतदान केंद्र असताना तेथील रहिवाशांना सुमारे ३ किमी लांब जावे लागत होते. तर झोपडपट्टी भागातल्या मतदारांना सोसायटीमध्ये मतदानासाठी जावे लागत असल्याचे चित्र ठाणे विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी दिसून आले. याबाबत मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ठाणे शहर विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी गृसंकुलातील नागरिकांना ते राहत असलेल्या ठिकाणी मतदान करता यावे यासाठी गृसंकुलात मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. मात्र तेथील मतदारांची नावे ते राहत असलेल्या ठिकाणापासून तीन ते चार किमी अंतरावर गेली होती. तसाच प्रकार झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या बाबतीत दिसून आला. येथील मतदारांची नावे सोसायटी मधील मतदान केंद्रावर आली होती. त्यामुळे गोंधळाचा त्रास मतदारांना नाहक सहन करावा लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.