कळवा रुग्णालयात अनागोंदी, एका दिवसात ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 06:10 AM2023-08-12T06:10:23+5:302023-08-12T06:10:34+5:30
गरोदर महिलेचा समावेश; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे पूर्णत: नियोजन कोलमडून अनागोंदी कारभार दिसून आला. वेळेवर उपचार न मिळाल्याने एकाच दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात एका गरोदर महिलेचा समावेश आहे. दरम्यान, अतिदक्षता विभागात रुग्णाचा मृत्यू होऊन सहा तास उलटूनदेखील तेथेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दरम्यान, कळवा रुग्णालयाची रुग्ण ॲडमिट करून घेण्याची क्षमता संपली होती. आयसीयूदेखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. जे तीन रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते, असा खुलासा प्रशासनाने केला आहे. तसेच दुर्दैवाने गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी स्पष्ट केले. यात तीन रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात आले होते. यामध्ये एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने, तर दुसऱ्याचा उलटी झाल्याने मृत्यू झाला. एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका रुग्णाच्या पायाला गळू झाले होते. तसेच एका गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. माळगावकर यांनी यावेळी दिली.
सावळागोंधळाची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. रुग्णालयातील परिस्थिती बघून आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात रुग्णालयाची ही अवस्था असेल तर स्मार्ट सिटी करण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी कशासाठी हवी? याच शहरातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र कळव्यात दिलसले. मल्टिस्पेशालिटी, कर्करोग रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात येते. मात्र, सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाची गरज आहे, असे ते म्हणाले.
निधन पावलेल्या रुग्णावर आयसीयूत उपचार?
ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात मृत रुग्णावर उपचार सुरू असल्याचे त्याच्या नातलगांना भासवण्यात आले. दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन जिवंत असणाऱ्या रुग्णांचादेखील जीव धोक्यात टाकण्यात आला, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटद्वारे केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू होता हे खेदजनक आहे. याबाबत कुणावर कारवाई होईल ही आशा नाहीच, असेही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.