चालक उपस्थित झाल्यास दंड आकारणी करा: वाहन ‘उचले’गिरी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:05 PM2017-12-26T22:05:51+5:302017-12-26T22:09:01+5:30
नो पार्किंगमधील वाहन उचलल्यानंतर वाहतूक टोर्इंग करणा-या वाहनाच्या मागे धावणारा चालक... त्यानंतर पोलिस आणि चालक यांच्यात झालेला वाद.. या नेहमीच्या प्रकारामध्ये यापुढे आता बदल होणार आहे.
ठाणे: ‘नो पार्र्किंग’मधील दुचाकी अथवा चार चाकी वाहनांवर कारवाई करतांनाच चालक उपस्थित झाल्यास वाहन उचलून नेण्याची कारवाई थांबवून त्याऐवजी दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी ठाणे शहर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेला दिले आहेत. या नविन आदेशामुळे वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बºयाचदा वाहतूकीचे नियम मोडणाºया, वाहने नो पार्र्किंग झोन मध्ये किंवा रस्त्यात अडथळा निर्माण होईल, अशा त-हेने उभी करुन बाजारात किंवा रुग्णालयात जाणा-या चालकांची वाहने उचलून नेण्याची कारवाई वाहतूक शाखेकडून केली जाते. संबंधित वाहन उचलून नेण्याची कारवाई सुरु असतांनाच जर वाहन चालक उपस्थित झाला तर त्याला त्या त्या कार्यक्षेत्रातील वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीत उपस्थित राहण्याचे फर्मान पोलीस हवालदाराकडून काढले जाते. त्यातूनच वाहन चालक आणि पोलीस यांच्यात खटके उडतात. बहुतांश वेळा ‘जो काही असेल तो दंड आकारा पण आता गाडी सोडा’, अशी माफक अपेक्षा वाहन चालकांची असते. हीच समस्या लक्षात घेऊन सह पोलीस आयुक्त पांडेय यांनी यामध्ये सुधारणा करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांना दिले आहेत. त्यानुसार यापुढे नो पार्र्किंग मधील वाहन उचलण्याची प्रक्रीया सुरु असतांनाच तिथे जर वाहन मालक किंवा चालक उपस्थित झाला तर नो पार्र्किंगसाठीचा जो काही दंड असेल तो आकारुन गाडी संबंधित चालकाच्या स्वाधीन करण्यात येईल. समजा, त्यातही काही समस्या असेल, पैसे नसतील, तर ई चलनामार्फतही दंड आकारला जाईल. यात गाडी उचलण्याचा आकार समाविष्ट केला जाणार नाही. पण गाडी उचलल्यानंतर गाडीचा मालक तिथे आला तरीही त्याला चौकीत बोलविण्याऐवजी गाडी लगेचच दिली जाईल, त्यासाठी त्याच्याकडून नो पार्र्किंग साठीचा दंड तसेच गाडी टोर्इंग अर्थात ती उचलण्याचे शुल्कही गाडी चालकाकडून आकारले जाईल, अशा महत्वाच्या दोन बदलाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण, मालक तिथे नसल्यास मात्र गाडी उचलण्याची कारवाई केली जाणार आहे. हे बदल तात्काळ अंमलात आणण्याचे आदेश उपायुक्त काळे यांनी ठाणे शहर आयुक्तालयातील ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या पाचही परिमंडळातील १८ युनिटसच्या वरीष्ठ निरीक्षकांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.