नालेसफाई न करताच काढली बिले, संजय केळकर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 01:05 AM2019-05-09T01:05:41+5:302019-05-09T01:05:57+5:30
ठाणे पालिकेच्या हद्दीत पातलीपाडा परिसरात दोन वर्षे नालेसफाई न करता बिले काढण्याचा प्रकार झाल्याचा आरोप भाजपचे आ. संजय केळकर यांनी केला आहे.
ठाणे : ठाणे पालिकेच्या हद्दीत पातलीपाडा परिसरात दोन वर्षे नालेसफाई न करता बिले काढण्याचा प्रकार झाल्याचा आरोप भाजपचे आ. संजय केळकर यांनी केला आहे. मागील तीन वर्षांपासून नाले सफाईत भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
कळव्यात दोन वर्षांपूर्वी नाल्याशेजारी राहणाऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे. कळव्यातील वाघोबानगर, कौसा येथील कादर पॅलेस, ठाणे शहरातील गोकुळनगर, वृंदावन, आनंद पार्क, आझादनगर एक, केसल मिल परिसर, बाळकूम पाडा क्र. १, महागिरी कोळीवाडा, मुंब्रा जामा मशिद येथे नाले तुंबून पाणी रहिवाशांच्या घरात शिरले होते. त्यांनतर महासभेत नगरसेवकांनी एकच हल्लाबोल केला होता. त्यावेळी अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण पुढे नालेसफाईच्या कामात हलगर्जी करून लोकांचे संसार उद्ध्वस्त करणाºया या ठेकेदारांच्या बिलाची रक्कम मात्र अदा करण्यात आली. या ठेकेदारांवर कारवाई तर सोडा, पण अशा ठेकेदारांची यादीही पालिकेच्या घनकचरा विभागाकडे नाही. अशा ठेकेदारांची नावे काढून त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांना पुन्हा नाले सफाईची कामे मिळणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे होते; पण पालिकेच्या घनकचरा विभागाने अशी काळजी घेतलेली नाही.
नाले सफाईच्या कामांत हलगर्जी करणाºया ठेकेदारांची काळी यादीच घनकचरा विभागाने तयार केली नाही. परिणामी दोन वर्षांपूर्वी कामात हलगर्जी करणाºया ठेकेदारांनाच पुन्हा कामे मिळाली. नाले सफाई न झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर प्रशासनाने कामात हलगर्जी करणाºया ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन मला दिले होते; पण ते पाळले गेले नाही, असे केळकर यांनी पत्रात म्हटले आहे.