कार्ला येथील एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या बाजूने पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांचा कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 08:37 PM2018-03-01T20:37:01+5:302018-03-01T20:37:01+5:30
श्री एकवीरा देवस्थानच्या मंदिरावरील कळस चोरीपासून तपासाऐवजी केवळ ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे हटाव मोहीम राबविली गेली. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी तरे यांच्या ट्रस्टला क्लीनचीट दिल्याने या वादावर तूर्तास तरी पडदा पडला आहे.
ठाणे : कार्ला येथील एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या बाजूने पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे भाविकांच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी समांतर बोगस ट्रस्ट स्थापन करू पाहणा-या मंडळींना ही चपराक असून देवीच्या कळसचोरीच्या प्रकरणाचाही आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) तपास करण्यात यावा, असा पुनरुच्चार ट्रस्टचे अध्यक्ष शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी बुधवारी केला.
ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी भिवंडीचे माजी खासदार सुरेश टावरे, ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, खजिनदार नवनाथ देशमुख, सहखजिनदार विलास कुटे, संतोष केणे, विद्या म्हात्रे तसेच रायगड, लोणावळा, ठाणे येथील आगरी कोळीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त रसबिरे यांनी २२ फेब्रुवारी २०१८ च्या आदेशात म्हटले आहे की, श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट किंवा विद्यमान अध्यक्ष अनंत तरे यांना पदावरून हटवण्यासाठीच षड्यंत्र रचण्यात आले होते. यापुढे बँकेत देवस्थानचे खजिनदार नवनाथ देशमुख आणि सल्लागार काळूराम देशमुख यांच्या संयुक्त स्वाक्षरीने कारभार चालवण्यात येईल. तरे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची एकही तक्रार नसल्यामुळे त्यांनी गैरव्यवहार केल्याचे म्हणता येणार नसल्याचाही निर्वाळा त्यांनी दिला. तसेच २०१४ ते २०१९ या कालावधीसाठीच्या पदाधिका-यांना त्यांनी मान्यता दिली असून यात अध्यक्ष या नात्याने आपला अंकुश राहणार असल्याचेही तरे यांनी स्पष्ट केले. भाविकांनी दान केलेले सोन्याचे दागिनेही संजय गोविलकर यांनी ट्रस्टकडे जमा केले नाही. समांतर ट्रस्ट स्थापन करून बोगस पावती छापणे, ही फसवणूक आहे. कळसचोरीच्या प्रकरणानंतर वेहेरगावच्या काही स्थानिक गावगुंडांनी दुकाने बंद करून आंदोलन केले. रास्ता रोकोही केला. पण, यात कळसचोरीच्या प्रकरणाऐवजी तरे हटाव मोहीम अधिक राबवण्यात आली. कळसचोरीच्या कालावधीत राजू देवकर या कर्मचाºयाने सीसीटीव्ही वळवल्याचे मान्य केले. पण, त्याने असे का केले, याचा अजूनही तपास लागलेला नाही.
कळस आणि तो चोरणारा पकडला पाहिजे. गुंडगिरी करणारे, विनाकारण देवस्थान ट्रस्टमध्ये हस्तक्षेप करणाºयांवर कारवाई व्हावी. विश्वस्त विलास कुटे यांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून धमकावून कोºया कागदावर स्वाक्ष-या घेणारे तसेच खजिनदार नवनाथ देशमुख यांना खोलीत कोंडून ठेवणारे मिलिंद बोत्रे व इतरांवर कारवाई करावी. कळसचोरी प्रकरणात हलगर्जीपणा करणाºया लोणावळा पोलीस ठाण्याच्या एपीआय साधना पाटील यांच्यावर कारवाई व्हावी. भाविकांचे अभिषेकाचे पैसे, मनीआॅर्डरने येणारे पैसे लाटणारा पुजारी संजय गोविलकर तसेच देणगीचे पैसे रीतसर बँकेत न भरता परस्पर खर्च करणारा विजय देशमुख यांच्यावर फौजदारी खटला दाखल करून कारवाईची मागणीही ट्रस्टच्या वतीने तरे यांनी या पत्रकार परिषदेत केली.
अदृश्य हात कोणाचा?
समांतर ट्रस्टला कोणीतरी अदृश्य हात मदत करीत असल्याचा आरोप अनंत तरे यांनी केला. मात्र, हा हात कोणाचा आहे? यावर मात्र त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. समांतर ट्रस्ट स्थापन करु पाहणा-यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे काही पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर शिंदे यांच्याकडे ही मंडळी देवीचा प्रसाद घेऊन गेली होती. मग कोणी प्रसाद घेऊन आल्यावर त्याला आपण नाही म्हणणार का? असा सवाल शिंदे यांनी केला होता, अशी आठवणही तरे यांनी करुन दिली. त्या मंडळींचा ‘मातोश्री’वर जाण्याचा कट होता. पण शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अनंत तरे हेच एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असल्याचे त्यांना स्पष्ट केल्यानंतर त्यांनी अर्ध्यावरुनच काढता पाय घेतल्याचेही तरे यांनी सांगितले.
................................
निकालाचा अर्थच न कळाल्याने विरोधकांमध्ये जल्लोष
पुण्याचे सह धर्मादाय आयुक्त रसबिरे यांनी नेमकी काय निकाल दिला आहे, याचा अर्थच श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टच्या विरोधकांना कळला नाही. अनंत तरे यांच्यासह पदाधिका-यांना अधिकृतरित्या मान्यता दिली असून तरे यांच्याविरुद्ध गैरव्यवहाराची कोणतीही तक्रार नसल्यामुळे त्यांनी भ्रष्टाचार किंवा घोटाळा केल्याचे म्हणता येणार नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाचा अर्थच न कळल्यामुळे विश्वस्त विलास कुटे यांच्या घरासमोरच तथाकथित विरोधकांनी फटाक्यांची आतषबाजी केल्याचे तरे यांनी सांगितले.