फड गप्पांचा - कोणाच्या कुटुंबात काय चाललेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:49 AM2019-04-05T01:49:29+5:302019-04-05T01:49:56+5:30

हो... कारण नाही ठेवला तरी त्यांना काही फरक पडत नाही... हे आपण जाणून असावे...

Chat chat - what's going on in the family ... | फड गप्पांचा - कोणाच्या कुटुंबात काय चाललेय...

फड गप्पांचा - कोणाच्या कुटुंबात काय चाललेय...

Next

अमोल ठाकूर

मला सांगा ही प्रधानसेवकांची भाषणं कोण लिहितं?
काय झालं?
काय झालं म्हणून काय विचारता?
सगळी कामंधामं सोडून त्यांची सभा ऐकायला बसायचं आणि ते विकासाचं, नवभारताचं काही सांगतील असं वाटत असतानाच... प्रधानसेवक भलतेच काही सांगू लागतात. कोणाच्या कुटुंबात काय चाललं आहे, कोण तिहारमध्ये आहे म्हणून कोणाची झोप उडाली आहे... कोण गतिरोधक आहे... हे काय प्रधानसेवकांनी बोलायचे विषय आहेत का?
अच्छा, कळला तुमचा त्रागा. ते बारामतीकरांना म्हणाले की, ‘‘त्यांच्या कुटुंंबात गोंधळ सुरू आहे...’’ मग गोंदियात म्हणाले, ‘‘एनसीपीच्या नेत्यांची झोप उडाली आहे... कोणीतरी तिहारमध्ये काही बोलेल म्हणून...’’ हे असं बोलावं लागतं... ते राजकीय भाष्य असतं.
पण...
पण काय आणि बिण काय... प्रधानसेवक आहेत ते. समोर बसलेल्या हजारो लोकांना काय सांगणार... आपण पाच वर्षांत कशी प्रगती केली... किती स्मार्ट सिटी तयार केल्या... किती शौचालयं बांधली... किती रेल्वे स्टेशनांत किती सरकते जिने लावले... या सगळ्याची उजळणी करत बसले तर लोक भाषण ऐकतील का? त्यांना असे आरोप-प्रत्यारोप, खुली आव्हानं, उणीदुणी हेच ऐकायचं असतं...
असं कसं काय म्हणता तुम्ही? मग देशाला दिशा कोणी द्यायची... पुढचा विचार काय ते कोणी सांगायचं?
ते काय हे असं जाहीर प्रचार सभांमध्ये सांगायचं असतं का? ते वेळोवेळी होणाऱ्या सभा, संमेलनांत बोललं जातंच की... कधी कधी वेळ झाला तर संसदेतही ते बोलतात... त्यातून दिशा मिळते.
पण तिथेही ते हेच बोलत होते... सत्तर वर्षांची टेप वाजवत होते... आधीचे सत्ताधारी कसे होते हेच तर ते गेले पाच वर्षं सांगत होते... आता तेच तेच परत कशाला?
हे राजकारण आहे... जाहीर सभेत बोलायच्या गोष्टी वेगळ्या, खासगीतल्या वेगळ्या, कौतुक सोहळ्यातल्या वेगळ्या... ही मोठी माणसं जेव्हा बोलतात तेव्हा मोजूनमापून बोलतात... त्यांच्या बोलण्याचे काय पडसाद उमटतात हे जाणून घेण्यासाठी बोलतात... त्यातून जनतेच्या मनाचा अंदाज घेतात... आधी बोललेलं पुसून टाकायचं असेल तर... मी असं बोललोच नव्हतो किंवा माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता असं म्हणतात...
...आणि त्यावर आपण विश्वास ठेवायचा?
हो... कारण नाही ठेवला तरी त्यांना काही फरक पडत नाही... हे आपण जाणून असावे... म्हणजे मग भाषण कोणी लिहिलं असा आपल्याला प्रश्न पडत नाही.
- म. हा. मुंबापुरीकर

Web Title: Chat chat - what's going on in the family ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.