डीजेच्या जमान्यात ढोलताशा टिकवण्याचे मोठे आव्हान- छत्रपती संभाजी राजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:59 AM2019-01-29T00:59:50+5:302019-01-29T01:00:17+5:30
डोंबिवलीत झालेल्या राज्यस्तरीय तालसंग्राम ढोलताशा स्पर्धेत ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ या पथकाची बाजी
डोंबिवली : ढोलताशा ही पारंपरिक वाद्ये संस्कृतीचा भाग आहेत. डीजेच्या दणदणाटात ही वाद्यसंस्कृती टिकवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. अनेक पारंपरिक खेळही लुप्त होत आहेत. हा सर्व सांस्कृतिक ठेवा जपायचा असल्यास विविध ठिकाणी ढोलताशा पथक, लाठीकाठीची प्रात्यक्षिके करणारे संघ तयार होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘तालसंग्राम’सारख्या स्पर्धा भरवून प्रात्साहन दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या किल्ले संवर्धन समितीचा अध्यक्ष म्हणून त्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिले. स्पर्धेत ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ या पथकाने बाजी मारली.
आरंभ प्रतिष्ठानतर्फे झालेल्या तालसंग्राम २०१९ या राज्यस्तरीय ढोलताशा स्पर्धेला रविवारी संभाजी राजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी किल्ले संवर्धनाचे महत्त्व, गरज आणि व्याप्ती विशद करताना पारंपरिक वाद्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आयोजकांनी केलेला प्रयत्न स्तुत्य असल्याचे सांगितले. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष निशांत चव्हाण, स्पर्धेचे प्रमुख सल्लागार अनिकेत घमंडी, यज्ञेश पाटील, श्रीकांत घोगरे, हृषीकेश पाठक आदींसह आरंभ प्रतिष्ठानतर्फे संभाजी राजे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
राज्यभरातून या स्पर्धेत एकूण १६ पथके सहभागी झाली होती. त्यामध्ये ‘मावळे आम्ही ढोलताशांचे’ (डोंबिवली) पथकाने प्रथम क्रमांक, तर ‘कालभैरव’ (रत्नागिरी) द्वितीय, शिवस्वरूप’ने (भिवंडी) तिसरे पारितोषिक पटकावले. तसेच उत्कृष्ट ढोलवादक म्हणून लतिका मोरे, उत्कृष्ट ताशावादक सिद्धेश पटारे, उत्कृष्ट टोलवादक एॅलवोन फर्नांडिस, तर उत्कृष्ट ध्वजधारी म्हणून मधुरा के. या स्पर्धकांनी मान पटकावला. शिस्तबद्ध पथक म्हणून औरंगाबादच्या ‘आपलंच वाद्य’ या पथकाचा सन्मान करण्यात आला.
विजेत्या पथकाला दीड लाखांचे पारितोषिक देऊ न चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर उपविजेत्या पथकाला एक लाखांचे पारितोषिक देऊ न केंद्रे यांच्या हस्ते, तर तृतीय क्रमांकाला ५० हजारांचे पारितोषिक देऊ न विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी गौरवले. वैयक्तिक पारितोषिक जिंकणाऱ्यांनाही मान्यवरांनी सन्मानित केले. ही स्पर्धा यापुढेही सुरू राहण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिले. तर दीपेश म्हात्रे यांनी आगामी काळात ही स्पर्धा डोंबिवली पश्चिमेला खाडीकिनारी भरवण्यात यावी, असे आवाहन केले. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधींच्या निधीची विशेष तरतूद केली आहे. त्या समितीचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आहेत. रायगड येथेदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचे प्रामुख्याने संवर्धन, जतन करण्यासाठी राजांनी आवर्जून यावे, सूचना द्याव्यात, असेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले. आरंभ प्रतिष्ठानला शिवजयंतीला दिल्लीमध्ये त्यांची कला सादर करण्यासाठी संभाजी राजांनी संधी दिल्याचे त्यांनी जाहीर केले.
सोहळ्याच्या शुभारंभाला उद्घाटक म्हणून महापौर विनीता राणे, नाशिक जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर, कल्पना किरतकर, मुकुंद पेडणेकर, सभापती साई शेलार, माजी नगरसेविका शिल्पा शेलार, नगरसेविका ज्योती मराठे, ठामपाचे नगरसेवक संजय वाघुले, शशिकांत कांबळे, संजीव बीडवाडकर, रवी ठाकूर, उपायुक्त सुनील जोशी आदींनी आवर्जून उपस्थिती लावली.
पद्मश्री वामन केंद्रे यांचा सत्कार
‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’चे माजी संचालक वामन केंद्रे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचा सर्वप्रथम जाहीर सत्कार प्रतिष्ठानतर्फे संभाजी राजे यांच्या हस्ते झाला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गडकिल्ले संवर्धनासाठी विशेष मोहीम सुरू केल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार छत्रपती संभाजी राजेंनी केला.